
पानटपऱ्यांच्या आडोशाला ‘कल्याण’चा मटका
सोलापूर - शहरात सात हजारांहून अधिक पानटपऱ्या आहेत. काही टपऱ्यांच्या आडोशाला ‘कल्याण’चा मटका खेळण्याचे प्रकार सुरू असल्याची बाब पोलिसांनी महिनाभरात केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. दिवसातून दोनवेळा हा मटका खेळला जातो. सुट्टा, जॉइंट तथा पाना तसेच ओपन आणि क्लोज असे मटक्याचे प्रकार आहेत. त्यातून अनेकजण बरबाद झाले असून, अनेकांच्या संसारात मटक्याने विष कालवले आहे. सोलापूरला लागलेला मटक्याचा शाप पुसून टाकण्यासाठी पान शॉपच्या आडोशाला चालणाऱ्या ‘कल्याण’चा ‘मास्टर माइंड’ शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार मावा, पानमसाला, गुटखा, सुगंधी तंबाखू, स्वीट सुपारी विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले. गुटखा बंद झाल्यानंतर अनेकांनी शेजारील राज्यातून गुटखा आणायला सुरवात केली. अनेकदा शहर पोलिसांनी पान टपऱ्यांसह त्या मालाचा साठा केलेल्या गोदामांवर कारवाई केली.
तत्पूर्वी, गुटखाबंदी झाल्यावर सुपारी आणि तंबाखू वेगवेगळी करून त्याची विक्री होऊ लागली. इंडियन पिनल कोडमधील कलम ३२८ नुसार लोकांना विषारी पदार्थ खायला दिल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो. पण, शहरातील बहुतेक चौकांमध्ये मावा खुलेआम विक्री होतोय. दुसरीकडे, अनेक पानटपऱ्यांवर गुटखा, सुगंधी तंबाखू असे पदार्थ मिळतात.
काही दिवसांपूर्वी टपऱ्यांवर खुली सिगारेट मिळणार नाही, यासंदर्भातही नियमावली तयार झाली. पण, सर्रासपणे त्याचे उल्लंघन होत असल्याची स्थिती आहे. व्यसनमुक्तीच्या गप्पागोष्टी करताना शासकीय यंत्रणांनी जनजागृतीबरोबरच कारवायांमध्ये सातत्य ठेवल्यास निश्चितपणे ते अवैध प्रकार बंद होतील, असा सर्वसामान्यांना विश्वास आहे.
रिकाम्या जागांमध्ये मद्यपींचे अड्डे
शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या रिकाम्या जागा आहेत. पडीक जागा तथा इमारती आहेत. त्या ठिकाणी (रस्त्यालगत) रात्रीच्यावेळी मद्यपींची मैफल जमते, ही स्थिती तेथे पडलेल्या रिकाम्या बाटल्यांवरून स्पष्ट होते. अवैधरीत्या तयार केलेली हातभट्टीची विक्री करणे कायद्याने बंदी आहे. तरीपण, शहरात अनेक ठिकाणी विशेषत: सलगरवस्ती, जेलरोड, जोडभावी, सदर बझार या पोलिस ठाणे परिसरात हातभट्टीची विक्री होते. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रामीण भाग हातभट्टीमुक्त होण्यासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हाती घेतले. पण, ग्रामीण भागातून विशेषत: तुळजापूर हद्द व तळेहिप्परगा येथून हातभट्टी दारू शहरात आणली जाते. त्यावर शहर पोलिसांना विशेष वॉच ठेवावा लागणार आहे. तसेच रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याचीही आवश्यकता आहे.
मटक्याचा मास्टर माइंड कोण?
शहरात मटका-जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कामगार वस्तीतील व काही मध्यमवर्गीय लोक मटका खेळतात, असे आतापर्यंतच्या कारवाईतून दिसून येते. ओपन, क्लोज आणि पाना असे मटक्याचे प्रकार आहेत. शहरात ‘कल्याण’ नावाचा मटका खेळणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पण, अनेकदा विविध ठिकाणच्या गुन्ह्यांत एकाच व्यक्तीचे नाव येते. त्यामुळे शहरात मटका चालविणारा मास्टर माइंड कोण, याचे उत्तर अजूनही शहर पोलिसांना मिळालेले नाही.
मावा, पानमसाला, गुटखा, सुगंधी तंबाखू, स्वीट सुपारीची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. बंदी असलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर ‘आयपीसी’तील ३२८ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. सातत्याने तशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.
- प्रदीप राऊत, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर.
शहरातील मटका-जुगार पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त कारवाया करणे, सातत्याने गुन्हे दाखल करूनही मटका चालविणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे त्यांना सांगितले आहे.
- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर.
Web Title: Raid On Gambling In Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..