Solapur : रेल्वेला ‘सुरक्षा कवच’!

दौंड-वाडी मार्गावर बसविणार ‘टीसीएएस कम्युनिकेशन’चे टॉवर
 Railway
Railway sakal

सोलापूर : रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी उपाययोजना केल्या जातात. मात्र, आता सोलापूरसह दौंड, वाडी स्थानकाजवळ लवकरच ट्रेन कॉलिजन अव्हायडन्स सिस्टीम (टीसीएएस) अर्थात कम्युनिकेशन टॉवर बसविणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

रेल्वे सुरक्षेच्यादृष्टीने ही यंत्रणा मोठा बदल असल्याचे मानले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे चालकाने नजरचुकीने लाल सिग्नल ओलांडला तर रेल्वे आपोआपच जागेवर थांबणार आहे. शिवाय, चालकाच्या केबिनमध्ये पुढील सिग्नल दिसणार असल्याने रेल्वेची गती कमी करायची की नाही, हे चालकाला आधीच ठरवता येणार आहे.

देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवरील गाड्यांची गती वाढविण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. मुंबई-चेन्नई या मार्गावरील सोलापूर विभागातील दौंड-वाडी हा महत्त्वाचा सेक्शन असून, देशातील सुवर्ण चतुष्काेन मार्गात याचा समावेश होतो. या मार्गावरील रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा याकरिता रेल्वे अपघात रोखणारी ‘सुरक्षा कवच’ यंत्रणा मुंबई- चेन्नई रेल्वे मार्गावर बसवली जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दौंड-वाडी मार्गावरील काम हे सोलापूर विभागाच्या गती-शक्ती युनिटच्यावतीने केले जाणार आहे. यासाठी कम्युनिकेशन टॉवर उभारले जाणार आहेत.

हे असणार फायदे

सुरक्षा कवच आरडीएसओ अर्थात संशोधन डिझाईन आणि मानक संस्थेद्वारे विकसित

हे तंत्रज्ञान रेल्वे आणि स्थानकावर दोन्ही ठिकाणी वापरण्यात येणार

रेडिओ कम्युनिकेशन आधारित प्रणाली असून, रेल्वेच्या हालचालींवर ठेवणार लक्ष

रेल्वे गाड्यांचे समोरासमोर होणारे अपघात टळतील

चालकाला सिग्नलविषयी मिळेल अद्ययावत माहिती

रेल्वे रुळावरून घसरल्यास, रेल्वेचे इंजिन थांबताच १० सेकंदांत आपत्कालीन संदेश होणार प्रसारित

हा संदेश पोचेल तीन कि.मी.च्या परिघात प्रत्येक रेल्वेपर्यंत

जेणेकरून संबंधित मार्गावर येणाऱ्या गाड्या जिथे असतील तिथेच थांबतील

‘कवच’ (टीसीएएस) म्हणजे काय?

रेल्वे इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलिजन अव्हायडन्स सिस्टीम) ही प्रणाली बसवली जात आहे. ही यंत्रणा स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडलेली असते. यासाठी सोलापूर स्थानकावर कम्युनिकेशन टॉवर उभारले जातील. यांच्यामार्फतच इंजिन व सिग्नलवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. चालकाच्या नजरचुकीमुळे जर रेल्वेने लाल सिग्नल क्रॉस केला, तर रेल्वे जागेवरच थांबेल. यामुळे होणारी जीवित व वित्तहानी रोखली जाण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com