esakal | "राष्ट्रवादी व भाजप हे पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा एकत्र येणार !'
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty

"राष्ट्रवादी व भाजप हे पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा एकत्र येणार !'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपची नुरा कुस्ती सुरू आहे. हे पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत, असा खळबळजनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे जाहीर सभेत केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश प्रवक्ते रणजित बागल, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, उमेदवार सचिन शिंदे, शहाजान शेख, "विठ्ठल'चे माजी संचालक धनंजय पाटील, राजाराम सावंत, विश्रांती भुसनर, विजय रणदिवे, ऍड. राहुल घुले आदी उपस्थित होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. लोकांच्या खिशाला कात्री लावून वसुली सुरू आहे. लॉकडाउन काळातील थकीत वीज बिले माफ करतो, असं आश्वासनं दिलं पण सरकारने ते पाळलं नाही. अशा लबाड सरकारला जागा दाखवून देण्याची ही वेळ आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदार संघात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे गल्लीबोळात फिरत आहेत. त्यांना या उमेदवाराचे काहीच देणं- घेणं नाही. त्यांचा डोळा फक्त विठ्ठल साखर कारखान्यावर आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी या वेळी केला.

ही लढाई परिवर्तनाची आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असल्याने मतदारांनी जागृतीने मतदान करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

बातमीदार : भारत नागणे