esakal | जगप्रसिद्ध माथेरानच्या रस्त्याला सोलापूरच्या सुपुत्राचे नाव ! सध्या ते आहेत कल्याण-डोंबिवलीचे उपायुक्त

बोलून बातमी शोधा

Kokare

मूळचे करमाळा तालुक्‍यातील रिटेवाडी गावचे सुपुत्र असलेले रामदास तुकाराम कोकरे यांच्या कर्जत व वेंगुर्ला येथील कचरामुक्त डम्पिंग ग्राउंडच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन 2018 मध्ये जुलै महिन्यात तत्कालीन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माथेरानचा अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार कोकरे यांच्याकडे सोपवला होता. 

जगप्रसिद्ध माथेरानच्या रस्त्याला सोलापूरच्या सुपुत्राचे नाव ! सध्या ते आहेत कल्याण-डोंबिवलीचे उपायुक्त
sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजात वावरत असताना नि:स्वार्थपणे केलेल्या कामाची दखल कुठेतरी घेतली जाते, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रामदास कोकरे यांना आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान (जिल्हा रायगड) येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना कचरा व प्लास्टिक मुक्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन स्थानिकांनी त्यांचे नाव येथील "सेटविला नाका ते कचरा डेपो' या रस्त्याला दिले असून, नुकतेच याचे उद्‌घाटन कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

मूळचे करमाळा तालुक्‍यातील रिटेवाडी गावचे सुपुत्र असलेले रामदास तुकाराम कोकरे यांच्या कर्जत व वेंगुर्ला येथील कचरामुक्त डम्पिंग ग्राउंडच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन 2018 मध्ये जुलै महिन्यात तत्कालीन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माथेरानचा अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार कोकरे यांच्याकडे सोपवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी सार्थकी लावण्यासाठी त्यांनी प्लास्टिकमुक्त माथेरान तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरण ही मोहीम राबवत प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी देखील केली. त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडचे रूपांतर खेळाच्या मैदानात केले. 

रामदास कोकरे हे माथेरानला रुजू होण्यापूर्वी येथील कचऱ्याबाबत वाईट स्थिती होती. परंतु रामदास कोकरे हे रुजू होताच, पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा कचऱ्याबाबतचा प्रश्न कायमचा निकाली लावत येथील चेहरा-मोहरा बदलला. त्यांनी माथेरानच्या पर्यावरणपूरक सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल. तेथील नागरिकांनी त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून "सेटविला नाका ते कचरा डेपो' या रस्त्याला नाव देऊन नुकतेच विविध प्रशासकीय अधिकारी व नेतेमंडळींच्या हस्ते उद्‌घाटन केली आहे. रामदास कोकरे हे सध्या कल्याण- डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. अधिकाऱ्याने केलेल्या कामाची दखल घेऊन एखाद्या रस्त्याला नाव देण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. सोलापूरच्या सुपुत्राचे कोकणातील जगप्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळाच्या रस्त्याला नाव दिल्याने हे सोलापूरकरांसाठी नक्कीच गौरवास्पद गोष्ट आहे. 

रामदास कोकरे यांच्या कामगिरीबद्दल 32 कोटींची बक्षिसे 
2006 मध्ये पोलिस उपनिरीक्षक झालेले रामदास कोकरे यांनी त्या वेळी तंटामुक्ती अभियान ही मोहीम चांगल्या प्रकारे राबविली होती. त्यानंतर त्यांची 2010 मध्ये मुख्याधिकारीपदी निवड झाली. तंटामुक्तीकडून, प्लास्टिक मुक्तीकडे व तेथून कचरामुक्ती शहरे अशी उल्लेखनीय कामगिरी बजावत त्यांनी विविध शहरांना शासनाकडून आजतागायत 32 कोटी रुपयांची बक्षिसे मिळवून दिली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभागाचा वसुंधरा हा पुरस्कार चारवेळा मिळवणारे ते राज्यातील एकमेव अधिकारी आहेत. 

मी आतापर्यंत माझे कर्तव्य म्हणून काम करत गेलो. त्यातून यशाचे उच्चांक गाठत गेलो. माथेरान येथील कार्याची स्थानिकांनी दखल घेऊन रस्त्याला माझे नाव दिले, हा तेथील नागरिकांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे माझ्या प्रशासकीय व सामाजिक कार्याला अजून प्रेरणा मिळाली आहे. 
- रामदास कोकरे, 
उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल