esakal | Solapur : अमेरिकेतून 'हे' आले कसे? उजनी जलाशयात आढळले 'रेड इअर स्लाईडर'!
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी जलाशयात आढळले 'रेड इअर स्लाईडर'

दौंड तालुक्‍यातील सोनवडी येथील मच्छिमाराला रेड इअर स्लाईडर जातीचे अमेरिकन कासव नुकतेच सापडले आहे.

अमेरिकेतून 'हे' आले कसे? उजनी जलाशयात आढळले 'रेड इअर स्लाईडर'!

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : दौंड तालुक्‍यातील (Dound Taluka) सोनवडी येथील मच्छिमाराला रेड इअर स्लाईडर (Red Ear Slider) जातीचे अमेरिकन कासव (American Tortoise) नुकतेच सापडले आहे. इतर भारतीय कासवांपेक्षा हे कासव वेगळेच असल्याने आकर्षणाचा विषय बनले आहे. वजनाने व आकाराने हे कासव लहान असले तरी त्याच्यावरील असणारी रंगसंगती आकर्षित करणारी ठरत आहे. हे कासव भारतीय नसून, त्याला नदी- नाल्यात, धरणात अथवा मोकळ्या जंगलात सोडल्यास इतर प्रजातींच्या कासवांना धोकादायक ठरू शकते, असे मत कासव प्रेमी व अभ्यासक स्नेहा पंचमिया यांनी म्हटले आहे.

दौंड तालुक्‍यातील जिरेगाव तलावात मासेमारीसाठी गेलेले राजेंद्र केवटे व विशाल मल्लाव यांना हे कासव त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळले. इतर कासवांपेक्षा हे कासव वेगळे वाटल्याने त्यांनी ही माहिती "सकाळ' प्रतिनिधीला दिली. विशेष म्हणजे, राजेंद्र केवटे यांना गेल्या आठ वर्षांपूर्वी भीमा नदी पात्रात तब्बल दोनशे किलोहून अधिक वजनाचे कासव सापडले होते.

हेही वाचा: 'गुरे-गोठ्यांमध्ये रमणाऱ्या कांबळेंनी झेडपीचे दालन टक्केवारीचे केले!'

रेड इअर स्लाईडर जातीच्या या अमेरिकन कासवाच्या कान व डोळ्यामागे लालसर रंगाची छटा आहे तर पोट व पाठीवर नक्षीदार आकार आहे. पाण्यात व जमिनीवर याचे वास्तव्य असते मात्र त्याला दिवसातून किमान दोन तास तरी उष्णता मिळणे गरजेचे असते. योग्य तापमान त्याला मिळाल्यास रोगराईपासून बचाव तर होतोच शिवाय त्याला त्यातून एनर्जीही मिळते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. हे कासव शाकाहारी व मांसाहारी आहे. या कासवाला पाळणे तशी बंदी आहे; मात्र पाळायचे असल्यास किचकट प्रक्रिया पार पाडावी लागते.

दरम्यान, मूळचे अमेरिकन असल्याने हे कासव भारतात कसे आले, हा प्रश्न सतावत आहे. पाळण्याच्या दृष्टीने कोणीतरी आणले असावे व नंतर ते सोडून दिले असावे, अशीही शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या कासवाला आता वनविभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे. याबाबत वनाधिकारी घावटे म्हणाले की, या कासवाबाबात तज्ज्ञांशी चर्चा करून शक्‍यतो संग्रहालयात पाठवण्यात येईल.

डिसेंबर 2020 मध्ये एका मच्छीमार दाम्पत्याला कोंढार चिंचोली (ता. करमाळा) डिकसळ (ता. इंदापूर) या सरहद्दीवरील डिकसळ पुलाजवळ उजनी जलाशयात दुर्मिळ समजले जाणारे इंडियन स्टार जातीचे कासव मासेमारी करताना जाळ्यात सापडले होते. हे कासव पुढे त्यांनी वन विभागाच्या ताब्यात दिले होते.

हेही वाचा: नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! चौकशीचे आदेश

सुमारे तीस ते पन्नास वर्षे आयुर्मान असलेल्या या रेड इअर स्लाईडर कासवाची अमेरिका संयुक्त संस्थानातून आशिया खंडात तस्करी केली जाते. काही प्रमाणात अंधश्रद्धा व दिसण्यास विलोभनीयता या कारणांमुळे माणूस या कासवाच्या मोहात पडतो. हे कासव लगेच माणसाळते. पाळण्यासाठी आणलेल्या या कासवाला कोणी तरी नदीपात्रात सोडल्याची शक्‍यता आहे.

- डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक

loading image
go to top