esakal | "रेमडेसिव्हिर'च्या खुल्या विक्रीवर बंदी ! अन्न-औषध प्रशासनाचा डॉक्‍टरांना "हा' सल्ला; इंजेक्‍शनसाठी वणवण सुरूच 

बोलून बातमी शोधा

Remdesivir

आता कोव्हिड रुग्णांवर उपचार करणाऱ्या दवाखान्याशी संलग्नित शहरातील 36 तर जिल्ह्यातील 25 रुग्णालयांशी संलग्नित औषधी दुकानांमध्येच रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्या मेडिकलमध्ये इंजेक्‍शनच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची चिंता वाढू लागली आहे. 

"रेमडेसिव्हिर'च्या खुल्या विक्रीवर बंदी ! अन्न-औषध प्रशासनाचा डॉक्‍टरांना "हा' सल्ला; इंजेक्‍शनसाठी वणवण सुरूच 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बार्शी, करमाळा, पंढरपूर, माळशिरसमधून सर्वाधिक तर संपूर्ण जिल्ह्यातून दररोज सुमारे दीड हजारांवर रेमडेसिव्हिरची मागणी होत आहे. रुग्णाला वाचविण्यासाठी दररोज एक, या प्रमाणात पाच ते सहा इंजेक्‍शन दिले जातात. आता कोव्हिड रुग्णांवर उपचार करणाऱ्या दवाखान्याशी संलग्नित शहरातील 36 तर जिल्ह्यातील 25 रुग्णालयांशी संलग्नित औषधी दुकानांमध्येच रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्या मेडिकलमध्ये इंजेक्‍शनच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची चिंता वाढू लागली आहे. 

जिल्ह्यात 12 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचे आगमन झाले, त्याला आता वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच जिल्ह्यातील रुग्णसंख्या 67 हजारांकडे वाटचाल करू लागली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार 38 रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या आठ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लक्षणे असतानाही उपचारासाठी स्वत:हून पुढे न येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. त्यामुळे तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिरची गरज भासू लागली आहे. 29 मार्चनंतर जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर रेमडेसिव्हिरची मागणीही वाढली असून तेवढ्या प्रमाणात इंजेक्‍शनचा साठा खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे काही औषधी दुकानांसमोर रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा लागल्या असून, त्यांनी टोकन पद्धत सुरू केली आहे. 

तीन दिवसांपूर्वी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी 314 तर बार्शीच्या उपजिल्हा रुग्णालयाला 96 आणि करमाळ्याला 48 रेमडेसिव्हिर देण्यात आले असून महापालिकेनेही त्यांच्याकडील रुग्णांसाठी पुरेसा साठा ठेवला आहे. मात्र, ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होतात अशा खासगी रुग्णालयांनाही पुरेशा प्रमाणात रेमडेसिव्हिर उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्‍त नामदेव भालेराव यांनी दिली. 

तीन तालुक्‍यांतच साडेपाचशे मृत्यू 
ग्रामीण भागातील एक हजार 221 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये 11 तालुक्‍यांपैकी बार्शी (234), करमाळा (69) आणि पंढरपूर (253) या तीन तालुक्‍यांतील 554 रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 473 रुग्ण आढळले असून त्यापैकी 22 हजार 112 रुग्ण याच तीन तालुक्‍यातील आहेत. ग्रामीण भागातील तीन हजार 885 ऍक्‍टिव्ह रुग्णांपैकी एक हजार 819 रुग्ण या तीन तालुक्‍यातील आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी, करमाळा, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र, अन्य खासगी रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात इंजेक्‍शनच नाहीत. मागणीच्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी व अन्न व औषध प्रशासनाने डॉक्‍टरांनाच आवाहन केले आहे. 

एकाचवेळी सहा इंजेक्‍शन खरेदी करून ठेवू नका 
रेमडेसिव्हिर तयार करणाऱ्या एका कंपनीचे उत्पादन कमी झाल्याने जिल्ह्यात इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवला. परंतु, आता जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसाठी एक हजाराहून अधिक इंजेक्‍शनचा साठा असल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात ते मिळतच नसल्याची स्थिती आहे. ज्या रुग्णालयातून कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत आणि ज्यांना रेमडेसिव्हिरची गरज आहे, त्या रुग्णालयांनी एकाचवेळी पाच-सहा इंजेक्‍शन लिहून देऊ नयेत. दररोज एक अथवा एकावेळी दोन इंजेक्‍शन लिहून द्यावेत, जेणेकरून इंजेक्‍शनसाठी गर्दी होणार नाही आणि दुसऱ्या रुग्णांसाठी इंजेक्‍शन कमी पडणार नाहीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

इंजेक्‍शनसाठी हेलपाटे 
आमच्या कुटुंबातील रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहे. त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज असून खूप फिरल्यानंतर दोन इंजेक्‍शन मिळाले आहेत. 24 तासानंतर एक इंजेक्‍शनचा डोस द्यावा लागत असल्याने ते कसे मिळवायचे, याची चिंता आहे. 
- विवेक पाटील, 
रुग्णाचे नातेवाईक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल