Vitthal Statue History : पंढरीच्या लाडक्या विठुरायाच्या मूर्तीचे सुरक्षेसाठी अनेकवेळा झालं आहे स्थलांतर, जाणून घ्या इतिहास

प्रसंगानुसार १६६९ च्या कळात विविध गावात मूर्ती; दक्षिण काशीत १७१६ पासून कायमस्वरूपी विराजमानित
Vitthal Statue History
Vitthal Statue HistorySakal

Solapur News : दक्षिण काशी पंढरीच्या लाडक्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीला आक्रमणकाळात कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये, म्हणून मूर्तीचे अनेकदा विविध भागात स्थलांतर करण्यात आले. त्यामुळेच आजही पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती सुरक्षीत आहे.

या मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी तत्कालीन वतनदार देशमुखांकडे असायची. मूर्ती गावोगावी नेण्याचा प्रकार १६६९ पासून सुरु होता. १७१६ पासून मूर्ती दक्षिण काशी पंढरपूरात असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात.

पंढरपूरचे विठ्ठल मूर्तीला परकियांपासून हानी किंवा इजा पोचू नये म्हणून सन १६६९ पासून ही मूर्ती चिंचोली, गुरसाळे, व देगाव येथे प्रसंगानुसार वेळोवेळी सुरक्षिततेसाठी न्यावी लागली. परगणे कासेगावच्या अखत्यारीत पंढरपूर हे गाव त्यावेळी असल्याने या मूर्तीचा सांभाळ करण्यासाठी त्यावेळच्या देशमुखांनी काम केले आहे.

पंढरपूरच्या देवाच्या मूर्ती तांब्रागावात गोंधळ सुरु झाल्याने गुरसाळे, चिंचोली, देगाव या ठिकाणी प्रसंग पाहून सुरक्षिततेसाठी ठेवण्यात येत असत. तांब्रांची गडबड शांत झाल्यावर या देवाची मूर्ती परत मंदिरात आणीत असत.

त्यावेळी त्याची प्रतिष्ठापना सिंहासनावर होण्यासाठी कासेगाव परगण्याचे देशमुख आणि देशपांडे यांनी छत्रपती शाहू महाराजांकडे परवानगी मागितली. त्यानुसार, शाहू छत्रपतींनी २३ ऑक्टोबर १७११ रोजी कौलनामा देऊन देवास सिंहासनी बसवून महोत्सव करण्यास सांगितले होते.

नंतर परत शाहू छत्रपतींनी १७१६ साली पुन्हा एकदा क्षेत्राचे समस्त ब्राह्मण, पुजारी, बडवे, मोकादम, शेटे, महाजन यांना देव सिंहासनी बसविण्याचे अभयपत्र दिल्याचा उल्लेख जुन्या मोडी कागदपत्रात आहे. पंढरपूरचा विठ्ठल हा समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्याची सुरक्षितता व पुनः देव सिंहासनी बसण्याबाबतची जोखीम या घराण्यातील देशमुखांचेवर असे यातून दिसून येते.

कासेगाव परगण्यात ४० गावे

कासेगाव परगणा ४० गावांचा होता. कसबे कासेगांव, वाडीसह, मौजे मुहंम्मदापूर, मौजे रांजणी शेटफळ, (वाडीसह), रामापूर (वाडीसह), संगेवाडी, मांजरी, वाकरी, मुंढेवाडी (वाडीसह), देवळे, कोरटी, नेपतगाव, सेगाव, चिचुंबे, उंबरगाव, सिद्धेवाडी, सेलेवाडी, मुहंमदाबाद, भोवाळी, सुरगाव (वाडीसह), टाकळी,

दहीवाड (वाडीसह), सिरबाबी, तनाळी, (गुंजेगाव), गायगव्हाण, गायगाव, खर्डी, तिसंगी, वाकी, घरनिकी, गादेगांव खुर्द याप्रमाणे ही नावे आहेत. काही गावांखाली वाड्या आहेत. त्यांच्यासह ४४ गावची देशमुखी या गावचे देशमुखाकडे असावी असे दिसून येते.

परकीय आक्रमणकाळात मंदिरे व मूर्ती फोडणे असे प्रकार व्हायचे. केवळ पंढरपूरचा विठ्ठलच नाही तर अनेक मंदिरातील देवतांच्या मूर्ती सुरक्षिततेच्या कारणांनी अन्यत्र हलविल्या जात असत. आपल्या देवतांच्या मूर्ती सुरक्षीत राहाव्यात हा यामागचा उद्देश होता.

- डॉ. धम्मपाल माशाळकर, मोडी लिपी तज्ज्ञ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com