कमालच आहे, फुलपाखरे मिमिक्री करतात ! सोलापूरच्या अभ्यासकांनी लावला शोध 

Butterfly
Butterfly

सोलापूर : फुलपाखरे अनेक रंगांची व प्रकारची... पण त्यांमध्ये असतो एक नकलांचा अद्‌भुत मिमिक्री शो... निसर्गाने घडवलेला... कधी संरक्षणासाठी उपयुक्त... तर कधी मात्र निसर्गाचा वार उलटवून घेण्यासाठी... ग्रेट एगफ्लाय फुलपाखरांचा एक आगळा मिमिक्री शो सोलापूर शहरामध्ये नव्या रूपाने निसर्गातील गुपितं सांगणारा ठरला. 

निसर्ग अभ्यासक अजित चौहान हे शहरातील विविध भागांत फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी फिरताना त्यांना निरीक्षणाच्या वेळी मिमिक्रीचा हा प्रकार लक्षात आला. 

शहरातील विद्यापीठामागील वनक्षेत्राच्या जमिनीलगत डबल बॅंडेड क्रो हे फुलपाखरू दिसून आले. त्यांना आणखी त्याच प्रकारचे दुसरे फुलपाखरू दिसले. जेव्हा या दोन्ही फुलपाखरांचे फोटो काढून अभ्यास केला तर दुसरे फुलपाखरू हे डबल बॅंडेड क्रोसारखे दिसत असले तरी त्याच्या पंखांच्या रंगसंगतीमध्ये ठिपक्‍यांचा वेगळेपणा होता. अभ्यास केला असता डबल बॅंडेड क्रो फुलपाखरासारखे दिसणारे हे दुसरे फुलपाखरू ग्रेट एगफ्लाय या प्रकारातील आहे, हे लक्षात आले. ग्रेट एगफ्लायची मादी मात्र डबल बॅंडेड क्रोसारखी रंगसंगती असलेली दिसते. निसर्गातील या प्रकाराला नक्कल म्हणजे मिमिक्री म्हटले जाते. 

डबल बॅंडेड क्रो हे फुलपाखराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पंखांतून येणाऱ्या उग्र वासामुळे पक्षी त्याला खाण्याचे टाळतात. त्यामुळे या फुलपाखराची नक्कल ग्रेट एगफ्लाय फुलपाखराची मादी करते. या मिमिक्रीमुळे तिचे पक्ष्यांच्या शिकारीपासून संरक्षण होते. अंडी घालण्यासाठी लागणारी (लार्वा होस्ट) वनस्पती शोधण्यासाठी मादींना हळूहळू उड्डाण करावे लागतात आणि त्या अंडी घालण्यासाठी स्थायिक होतात. अंडी घालण्याच्या सुरक्षिततेसाठी ही नक्कल उपयोगी ठरते. 

या प्रकारच्या नकला करणाऱ्या फुलपाखरांच्या इतरही काही जाती आहेत. प्लेन टायगर या फुलपाखराची नक्कल डिमेड एगफ्लाय या प्रकारच्या फुलपाखराच्या मादीकडून केली जाते. 
कॉमन रोज व क्रिमसन रोज या दोन फुलपाखरांची नक्कल कॉमन मॉरमन या फुलपाखराची मादी करते. निसर्गाने ही नक्कल करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये दिली आहे. विशेष म्हणजे, एखाद्या प्रजातीमधील फुलपाखराची मादी ही नक्कल करत असेल तरी नर मात्र स्वतःच्या प्रजातीची ओळख कायम ठेवतो. अंडी देण्यासाठी असलेली सुरक्षितता व शिकारीपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न या मिमिक्रीतून केला जातो. मात्र हा नकलाचा प्रकार कमी असेल तर नक्कल करणाऱ्या फुलपाखरांना उपयोगी ठरतो. मात्र एकाच भागात मूळ फुलपाखरांची नक्कल करणाऱ्या फुलपाखरांची संख्या वाढली तर शिकारही जास्त होऊन हा खेळ अंगावर उलटतो. 

निसर्गातील हा अगदी वेगळा चमत्कार अनुभवता आला. सोलापूर शहरात अशा प्रकारच्या डबल बॅंडेड क्रो फुलपाखरांच्या बाबतीत हा पहिलाच मिमिक्री शो जैवविविधतेमध्ये नोंदवला आहे. 
- अजित चौहान, फुलपाखरू निरीक्षक, सोलापूर 

निसर्गामध्ये फुलपाखरांच्या काही प्रजातींमध्ये अशा प्रकारच्या नकलांचे प्रकार नैसर्गिकपणे आढळून येतात. सोलापूर शहरामध्ये यापूर्वी प्लेन टायगर व कॉमन रोज या दोन फुलपाखरांच्या बाबतीत हा मिमिक्रीचा प्रकार पाहण्यास मिळाला होता. 
- आदित्य क्षीरसागर, फुलपाखरू अभ्यासक, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com