कोठेंच्या पक्षांतरामुळे शिवसेना एकाकी ! महापालिकेसाठी राष्ट्रवादीतर्फे संजयमामा तर कॉंग्रेसकडून प्रणितींकडे जबाबदारी 

Praniti_Sanjay.
Praniti_Sanjay.

सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असतानाही आणि युवासेना प्रमुख कॅबिनेट मंत्री असतानाही सोलापूर जिल्ह्याला संपर्कप्रमुख मिळू शकत नाही, हे दुर्दैवच असल्याची चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादीने महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची धुरा आमदार संजय शिंदे यांच्याकडे तर कॉंग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोपविली आहे. मात्र, शिवसेनेकडून कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज तानाजी सावंत हे पक्षीय राजकारणातून बाजूलाच झाल्याचे सध्याचे चित्र आहे. तर त्यांचे बंधू तथा जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत हे देखील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, पक्षांतर्गत कुरघोडीला वैतागलेले महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही पक्षांतराची मानसिकता तयार केली आहे. तूर्तास त्यांनी स्वत:च राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यमान विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची कोठेंशी जवळीकता पाहून आगामी बदलत्या राजकारणाची चाहूल आतापासूनच लागल्याचीही चर्चा आहे. 

कोठे यांच्या संपर्कात भाजप, शिवसेना, कॉंग्रेसमधील काही नगरसेवक असल्याचीही चर्चा आहे. राज्यातील महाविकास आघाडीने ठरवलेल्या अजेंड्यामुळे कोठेंचा अधिकृत प्रवेश लटकला असला, तरीही त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी जवळीकता साधायला सुरवात केली आहे. काही झाले तरी, आगामी महापौर राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्‍वास कोठेंनी पालकमंत्र्यांना दिल्याची चर्चा आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार संजय शिंदे यांच्याकडे तर कॉंग्रेसच्या नूतन कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे त्यांच्या पक्षाची जबाबदारी असणार आहे. तत्कालीन शहरप्रमुख, सहसंपर्क प्रमुखांना पक्षाने पदावरून काढून टाकले आहे. माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे हे देखील विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नाराज असून कोठेंना रोखता आले असते, असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. कधी नव्हे ते शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोठे यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास शिवसेनेचे शहरातील भविष्य काय, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख जिल्ह्याला कायमचा संपर्कप्रमुख अथवा संपर्कप्रमुख देतील का? याची उत्सुकता लागली आहे. 

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच ताकदवान? 
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्या वेळी तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील कोणालाही दुसऱ्या पक्षात प्रवेश देऊ नये, असा अजेंडा ठरवला आणि त्याची कबुलीही उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महेश कोठेंच्या पक्षांतरावेळी दिली. तरीही कॉंग्रेस, शिवसेनेत जाण्यास इच्छुक नसलेला नेता भाजपच्या गळाला लागेल, असा विचार पुढे करून अनेकजणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना, कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी विविध जिल्ह्यांचे सातत्याने दौरे करू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सद्य:स्थितीत महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच ताकदवान होऊ लागल्याचीही चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com