
निराधार, अनाथांचे संगोपन करायचे कसे? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही मिळेना निधी
सोलापूर : ज्या कुटुंबातील कर्ता मयत झाला, त्या निराधार बालकांना महिला व बालविकास विभागातर्फे बालसंगोपन योजनेतून दरमहा अकराशे रुपयांची मदत दिली जाते. कोरोना काळात अनाथ झालेल्या निराधार बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 320 निराधार बालकांना बालसंगोपनाचा लाभ मिळाला नसून जिल्ह्यातील 38 पैकी 17 अनाथ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले असून उर्वरित अनाथांना ती मदत मिळालेली नाही.
हेही वाचा: राज्य सरकारला कामगारांना साधा विश्वासही देता आला नाही - चंद्रकांत पाटील
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख 43 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेकांचा सुखी संसार विस्कटला आणि चिमुकली अनाथ झाली. काही कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्याने उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनामध्ये ज्या मुलांचे दोन्ही पालक मयत झाले, त्या अनाथ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. तत्पूर्वी, ज्या मुलांचा सांभाळ करणारा पालक मयत झाला, त्या कुटुंबातील मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, कोरोना काळात तशा मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि निधीची पंचाईत झाली. प्रत्येक जिल्ह्यातून एक हजारांहून अधिक प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे पाठविण्यात आले. मात्र, निधीअभावी त्यातील बहुतेक निराधार बालकांना त्या योजनेच्या लाभाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कुटुंबातील कर्ता अचानक कुटुंबातील मयत झाल्याने घरकाम करणाऱ्या महिला कामाच्या शोधासाठी वणवण फिरू लागल्याचे चित्र आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली, परंतु ठोस तोडगा निघालच नाही. राज्यात बालविवाह वाढू लागले आहेत. निराधारांना मदत मिळेना, त्यांच्या शिक्षणासाठी काहीच ठोस योजना नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभागावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: ''महाराष्ट्रात कोविडमुळे डॉक्टर, नर्ससह 86 कोरोना योद्ध्यांचा मृत्यू''
जिल्ह्यातील जवळपास तीनशे मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्यावा, असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. तर कोरोना काळात अनाथ झालेल्या 17 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले असून उर्वरित मुलांनाही काही दिवसांत त्यासाठी निधी मिळेल.
- डॉ. विजय खोमणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
जिल्ह्यातील निराधारांची स्थिती
कोरोनातील अनाथ बालके
38
मदतीच्या प्रतीक्षेतील अनाथ
21
बालसंगोपनास पात्र निराधार
920
लाभाच्या प्रतीक्षेतील बालके
320
Web Title: Rs 5 Lakh Has Not Been Deposited In The Orphans Account So How To Nurture
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..