esakal | Solapur: परदेशात लांबोटी चिवड्याचा ब्रॅण्ड! रुक्‍मिणीबाईंची अविस्मरणीय कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Rukminibai Khatal

रुक्‍मिणीबाईंचे निधन होऊनही ते ब्रॅण्ड आजही कायम टिकून आहे.

परदेशात लांबोटी चिवड्याचा ब्रॅण्ड! रुक्‍मिणीबाईंची अविस्मरणीय कामगिरी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: सन 1972 च्या दुष्काळात लोक पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र भटकंती करीत होते. त्यावेळी पती शंकरराव व मोठे दीर, सासूची खंबीर साथ मिळाल्याने रुक्‍मिणीबाई खताळ यांनी संकटाशी दोन हात करीत सोलापूर-पुणे महामार्गालगत लांबोटी (ता. मोहोळ) येथे झोपडीत कॅन्टीन सुरु केले. 43 वर्षांतील त्यांचे कष्ट, जिद्द, चिकाटी व मेहनतीतून "लांबोटी चिवडा' हे त्यांचे ब्रॅण्ड जागतिक पातळीवर पोहोचले. रुक्‍मिणीबाईंचे निधन होऊनही ते ब्रॅण्ड आजही कायम टिकून आहे.

हेही वाचा: नोव्हेंबरमध्ये 19 हजार पदांची भरती! आठवड्यात 'MPSC'ला मागणीपत्र

मोठे कुटुंब असल्याने झोपडपट्टीतील कॅन्टीनमधून त्यांचा उदरनिर्वाह भागत नव्हता. परिसरात लोकवस्तीही नव्हती. अशा संकटात रुक्‍मिणीबाईंचे पती शंकरराव यांनी ग्राहकांना कॅन्टीनकडे आकर्षित करण्यासाठी कसरतीचे चित्तथरारक खेळ करायला सुरवात केली. छातीवर मोठा दगड ठेवणे, सायकल हवेत फिरविणे, हवेत दगड फेकून तो झेलणे, अशा खेळांमधून त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. अनेक वाहनचालक त्यांचे खेळ पहायला त्याठिकाणी थांबू लागले. गुणवत्तेच्या बळावर त्यांनी सुरवातीला चहा फेमस केला. हळूहळू त्यांनी नाष्टा, जेवण सुरु केले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील त्या कॅन्टीनमधील ग्राहकांची संख्या वाढू लागली आणि त्यांनी स्वत: घरी बनविलेला मकेचा चिवडा विकायला सुरु केला. काही वर्षांनी पतीचा अपघात झाला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. पतीच्या मृत्यूनंतरही रुक्‍मिणीबाई खचल्या नाहीत आणि त्यांनी मुलगा तानाजी व गणेश यांच्या साथीने तो व्यवसाय सांभाळला. "हॉटेल जयशंकर'च्या माध्यमातून त्यांनी लांबोटी चिवडा व शेंगाचटणी हे दोन ब्रॅण्ड तयार केले. झोपडपट्टीचे रुपांतर हॉटेलमध्ये झाले, त्यांनी शेती विकत घेतली. त्यातून परिसरातील अनेकांना काम उपलब्ध करून दिले.

हेही वाचा: शंभर टक्‍क्‍यांच्या उंबरठ्यावर उजनी धरण! बळीराजाची मिटली चिंता

पुस्तकी ज्ञानाशिवाय घेतली गुरुडझेप

रुक्‍मिणीबाई शंकरराव खताळ या अशिक्षित असतानाही त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने रुचकर पदार्थ तयार करण्याची कला अवगत केली. रुपयांमधील व्यवसाय लाखांवर पोहोचविला. महाराष्ट्रासह परराज्यातील व परदेशातील ग्राहकांपर्यंत त्यांनी लांबोटी चिवडा व शेंगाचटणी पोहोचवली. सौदी अरेबिया, इंग्लंड, अमेरिका, नेदरलॅण्ड यासह अन्य काही देशांतील ग्राहकांपर्यंत लांबोटी चिवडा व शेंगाचटणी पोहोचली आहे. लांबोटी म्हटले की आता सर्वांनाच आठवतो तो लांबोटी चिवडा, अशी ख्याती रुक्‍मिणीबाईंच्या निधनानंतरही कायम टिकून आहे. 1972 च्या दुष्काळात सुरु केलेला व्यवसाय आजही तग धरून खंबीरपणे उभा आहे.

loading image
go to top