अधिवेशनाच्या शेवटी गृहमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिला महत्त्वाचा सल्ला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin waze

अधिवेशनाच्या शेवटी गृहमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिला महत्त्वाचा सल्ला!

सोलापूर : सोलापूर शहरातील सचिन वाझे महिन्याकाठी 60 लाखांची वसुली करतोय, बार्शी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक आमदाराच्या मुलाला गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण, त्याला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे कौतूक करीत आपल्या मनासारखे न झालेले लोक ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे असतात, तेच स्टिंग ऑपरेशन करतात, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. दुसरीकडे काहीजण अवैध धंदे बंद करताना पोलिसांना अडथळा निर्माण करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात गुन्हे शाखेचा पोलिस हवालदार अजय पाडवी यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात ते वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून पैसे मागत असल्याचे ऐकु येते. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ते स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांवरही आरोप केले. तो धागा पकडून विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी थेट अधिवेशनातच सोलापूर पोलिसांच्या वसुलीचे टार्गेट मांडले. पण, गृहमंत्र्यांनी त्यावर सावध भूमिका घेत तात्काळ माहिती मागवून घेतली. त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता याच्याविरुद्ध 5 तर त्याला मदत करणार्‍या दोघांविरुद्ध 2 व 4 असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मनासारखे झाले नाही म्हणून अशा प्रकारचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा खुलासा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सभागृहात केला. चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पोलिसांवर कारवाई केली जाणार नाही आणि चुकलेल्या कर्मचारी, अधिकार्‍यांना पाठीशी घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर स्टिंग ऑपरेशन प्रकरणानंतर पाडवी याला निलंबित केले असून त्याची चौकशी सुरू आहे, असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सभागृहाला सांगितले.

पोलिस अधीक्षकांची कामगिरी चांगली

सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक महिला आहेत. त्यांनी त्याठिकाणी अतिशय उत्तम काम करून दाखवले आहे. तर बार्शी पोलिसांनी तेथील दारू, अवैध वाळू वाहतूक, जुगार व मटका अशा अवैध व्यवसायांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. तरीही, आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या आरोपाची दुसरी बाजू जाणून घेतली जाईल. त्यांच्याशी मी स्वतः बोलेन, मी त्यांच्या सोबत राहीन, अशी ग्वाही दिली. दरम्यान, यापुढे बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी संपूर्ण माहिती घेऊन पुराव्यानिशी बोलावे, असा सल्लाही त्यांनी जाता जाता दिला. त्यांनी सभागृहात आपणही अनुभवी आहोत, याची झलक दाखवून दिली.

Web Title: Sachin Waze Devendra Fadnavis Dilip Walse Patil Attempt To Implicate Mla Son In Crime Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..