esakal | Solapur : महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ' प्रथम! राज्यस्तरीय गटात चार लाखांचे बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ' प्रथम!

महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ' सोलापूर आवृत्तीने चार लाखांचे पहिले बक्षीस पटकाविले.

महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ' प्रथम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या (Solapur Municipal Corporation) वतीने गणेशोत्सवानिमित्त (Ganesh Festival) 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ'च्या (Sakal) सोलापूर आवृत्तीने चार लाखांचे पहिले बक्षीस पटकाविले. महापौर श्रीकांचना यन्नम (shrikanchana Yannam), आयुक्त पी. शिवशंकर (P. Shivshankar), सभागृहनेते शिवानंद पाटील (Shivanand Patil) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सोलापूर महापालिकेने 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी वृत्तपत्रे, गणपती मंडळ, सामाजिक संस्था यांच्यासाठी विविध स्पर्धा ठेवल्या होत्या. माध्यमांसाठी घरगुती गणपती विसर्जन छायाचित्र प्रकाशनासंदर्भात ही राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन गटात स्पर्धा होती. यामध्ये सोलापूर "सकाळ'ने गणेशोत्सव काळात पर्यावरणाचा जागर करीत प्रदूषणविरोधी मोहीम राबविली.

'सकाळ'च्या वतीने सहयोगी संपादक अभय दिवाणजी, वितरण व्यवस्थापक राम गावडे, एचआरचे सहायक व्यवस्थापक अजय धाराशिवकर, बातमीदार प्रमिला चोरगी यांनी बक्षीस स्वीकारले. बक्षीस वितरण समारंभावेळी महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, एमआयएमचे गटनेते रियाज खरादी, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, उपायुक्‍त धनराज पांडे, परिवहन समिती सभापती जय साळुंखे आदी उपस्थित होते. गणेश उत्सव मंडळांमध्ये मंगळवेढा तालीम मंडळाने प्रथम क्रमांकाचे तर मानाचा कसबा गणपती मंडळास द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. वृत्तपत्र स्पर्धेत दिव्य मराठीला द्वितीय तीन लाखांचे तर जिल्हास्तरीय स्पर्धेत जनमतला प्रथम तीन लाखांचे व सुराज्यला द्वितीय क्रमांकाचे दोन लाखांचे बक्षीस मिळाले.

हेही वाचा: एकरकमी एफआरपी देणे कोणत्याही कारखान्यांना शक्‍य नाही : गिरमे

'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण, शैक्षणिक व सामाजिक आदी विविध उपक्रमांबाबत सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी माहिती दिली. पत्रकार श्रीकांत कांबळे, शिवाजी सुरवसे यांनी मनोगत व्यक्‍त केले. गटनेते रियाज खरादी, चेतन नरोटे यांची भाषणे झाली.

सोलापूर हरित शहर करण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. महापालिकेच्या वतीने या सामजिक उपक्रमामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. लोकांपर्यंत पोचण्यासाठी वृत्तपत्र हे मोठे माध्यम आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमासह शहर विकासामध्ये वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे.

- श्रीकांचना यन्नम, महापौर

कोरोनामुळे जीवनशैलीत मोठा बदल झाला आणि पर्यावरणाचे महत्त्व वाढविणे काळाजी गरज बनली आहे. जनता व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या माध्यमांना या उपक्रमात सहभागी करून घेतल्याने जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली. सामाजिक बांधिलकीचे भान राखत माध्यमांनी वर्षभर केलेली जनजागृती कौतुकास्पद आहे.

- पी. शिवशंकर, आयुक्‍त

थोरला मंगळवेढा तालीमने पटकावले दोन लाखांचे पहिले बक्षीस

महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक उपक्रमांतर्गत गणेशउत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 24 मंडळांनी सहभाग नोंदवला होता. त्यात थोरला मंगळवेढा तालीमने प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले. महापालिका सभागृहात आयोजित उपक्रमात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षिसाचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक थोरला मंगळवेढा तालीम, बक्षीस दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

दुसरा क्रमांक कसबा गणपतीला दीड लाख रुपये व सन्मानचिन्ह तर सोलापूर शहर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने एक लाख रुपयांचे तिसरे बक्षीस मिळविले. उत्तेजनार्थ मंडळांमध्ये वसंत विहार सांस्कृतिक मंडळ, परमवीर संस्कृतिक मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, ओंकार बहुउद्देशीय संस्था तसेच एस न्यूज मराठी यांना उत्तेजनार्थ बक्षीस 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

loading image
go to top