
Solapur News : आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न सुटला
मरवडे (ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवल्या जात असलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या 324 कोटी रुपयांपैकी डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 या महिन्यातील वेतनासाठी 216 कोटी रुपये इतके वेतन अनुदान उपलब्ध देण्यात आले आहे.
आश्रमशाळेतील कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत असल्याने स्वराज्य शिक्षक संघाने वेतन अनुदान ताबडतोब उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी मागणी केली केला होती, त्यांच्या मागणीला यश आले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळांमधील वेतन अनुदान हे वित्त विभागाकडून वेतन अनुदान फाईल मंजूर झाल्यानंतरच विभागास प्राप्त होते व वेतन अनुदान प्राप्त झाल्यानंतर ते राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यात येते.
आता चालू कालावधीत वेतन अनुदान तरतुद संपली असल्याने शासनाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वेतन अनुदानाची पुरक मागणी फाईल मंजूर केलेली आहे. वित्त विभागाकडून वेतन अनुदान पुरवणी फाईल मंजूर होऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास उपलब्ध होताच वेतन अनुदान सर्व जिल्ह्यांमध्ये तत्काळ उपलब्ध करून देण्यात येते. आज आता वेतन अनुदान उपलब्ध झाल्याने आता आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वेतन अनुदान ताबडतोब उपलब्ध करून दिल्याबददल स्वराज्य शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, सचिव श्री नंदकुमार उपसचिव कैलास साळुंखे, शिक्षक आमदार विक्रम काळे,
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक, कक्ष अधिकारी, उपसंचालक, सहाय्यक संचालक बहुजन कल्याण विभाग यांचे आश्रमशाळा कर्मचारी वर्गाकडून स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुभाष शेडबाळ यांनीअभिनंदन केले असून राज्यातील सर्व कर्मचारी यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन ताबडतोब जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने नेहमीच आश्रमशाळामधील कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.आजही वेतनाचा प्रश्न लक्षात घेऊन ताबडतोब वेतन अनुदान उपलब्ध होताच वितरीत करण्यात आले.
विभागाचे कामकाज प्रामाणिक आणि कर्मचारी हिताचे आहे त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव कैलास साळुंखे यांचे स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेकडून आम्ही मानतो. करोना काळात सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्यातील आश्रमशाळा कर्मचारी यांना न्याय देऊन वेळेवर वेतन करण्याचा प्रयत्न केलेला असून राज्यातील आश्रमशाळा कर्मचारी बांधव हे कधीही विसरणार नाहीत.
- फत्तेसिंह पवार , प्रदेशाध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य