esakal | ठाणे येथील सहाय्यक आयुक्तांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध! सांगोला नगरपरिषदेमार्फत काम बंद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध! सांगोला नगरपरिषदेमार्फत कामबंद आंदोलन

ठाणे येथे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका माथेफिरूद्वारे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा सांगोला नगरपरिषदेमार्फत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध! सांगोला नगरपरिषदेमार्फत आंदोलन

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : ठाणे येथे 30 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimpale) यांच्यावर एका माथेफिरूद्वारे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती येथे कडकडीत कामबंद आंदोलन (Agitation) करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून सांगोला (Sangola) नगरपरिषदेमार्फत काळ्या फिती लावून तसेच कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध (Protests) नोंदवण्यात आला.

हेही वाचा: सुशीलकुमार शिंदेंच्या पराभवानंतर बालेकिल्ला राखण्याची कॉंग्रेसची रणनीती!

30 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, माजीवाडा प्रभाग या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा हातगाडी फेरीवाला अमरजित यादव याने त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपणे तुटून रस्त्यावर पडली व उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या डोक्‍यावर खोल मार लागला. अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एक बोट पूर्णपणे तुटून पडले. या दोघांनाही प्रथमता वेदांत रुग्णालय, ठाणे येथे नेण्यात आले. गंभीर दुखापत व जिवाला असलेला धोका विचारात घेऊन दोघांनाही तत्काळ ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे दाखल करण्यात आले. कल्पिता पिंपळे यांच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची तुटलेली दोन्ही बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अंगरक्षक सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत शोध घेऊनही सापडले नसल्याने त्यांच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! माजी सैनिकाच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेमसाठी पैशाची मागणी

एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून, या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्‍यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती-पत्नी एकत्रीकरणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल, याचा सुद्धा गांभीर्याने विचार होणे आवश्‍यक आहे. सांगोला नगरपरिषदेमार्फत या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या कामबंद आंदोलनास लोकप्रतिनिधी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी देखील पाठिंबा दर्शवून आपला निषेध नोंदविला.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय आहे. या प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारांवर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत.

- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

loading image
go to top