उंटावरून मिरवणूक काढणाऱ्या सांगोल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांना पडला विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranjitsinh naik nimbalkar

लोकसभा निवडणुकीत अनेक मातबरांना धक्का देत माढा लोकसभेतून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली.

उंटावरून मिरवणूक काढणाऱ्या सांगोल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांना पडला विसर

सांगोला - राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मजबूत बालेकिल्ला म्हणून देशात ओळख असलेला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना जणू सांगोला तालुक्याचा विसरच पडला आहे. गेल्या वर्षभरापासून ते सांगोला तालुक्याकडे फिरकलेच नसल्याने 'खासदार गेले कुणीकडे' म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. 

लोकसभा निवडणुकीत अनेक मातबरांना धक्का देत माढा लोकसभेतून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यावेळी नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आणि या पक्षातील नेतेमंडळी उभी होती. स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे दोन दिग्गज नेते विरोधात असतानाही सांगोला तालुक्यातील तरुणांनी भाजपाचे खासदारकीचे उमेदवार असलेल्या निंबाळकर यांना तब्बल 70 हजार मते दिली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यापेक्षा निंबाळकर फक्त 5 हजार मतांनी पिछाडीवर राहिले. 2009 रोजी याच सांगोला तालुक्यातून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांना तब्बल 52 हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले होते.

तुलनेने नवखे उमेदवार असूनही देशात मोदी लाट असल्याने निंबाळकर यांना 2019 रोजी सांगोला तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली होती. ज्या सांगोला तालुक्याने जिल्ह्यातील उमेदवार असून आणि तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या विरोधात निंबाळकर यांना प्रचंड मते दिली. सध्या खासदार नाईक निंबाळकर यांचे सांगोला तालुक्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तालुक्यातील मतदारांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून खासदार झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सुरुवातीला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चांगलेच कौतुक झाले. राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र यांच्याकडे चांगलेच वजन असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पर्यायने मतदार संघातील सांगोला तालुक्यातील विकास कामांना चांगलीच गती मिळेल अशी येथील मतदारांची धारणा होती.

उंटावरून मिरवणूक ते उंटावरून शेळ्या....!

देशात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांची सांगोला शहरात उंटावरून काढलेली मिरवणूक चांगलीच गाजली होती. मात्र उंटावरून मिरवणूक कढल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्याच्या विकास कामाबाबत उदासीनता दाखवत त्यांनी आपले दर्शन केवळ दिल्ली आणि मुंबईतून टिव्हीवरूनच दिल्याने सध्या ते मतदार संघाचा कारभार उंटावरून शेळ्या हाकल्याप्रमाणे करत असल्याची चर्चा सध्या सांगोला तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.

आढावा बैठकीच्या फक्त घोषणा -

निवडणुकीनंतर काही काळ त्यांनी शहर व गावभेट दौरा केला होता. सांगोल्यात झालेल्या बैठकीवेळी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल असे खासदार नाईक-निंबाळकर यांनी घोषणा केली होती. परंतु आढावा बैठकीची फक्त ती घोषणाच राहिली, बैठका मात्र झाल्या नाहीत. महिन्यातून राहिले वर्षातून एकदा तरी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी बैठक घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

Web Title: Sangola Tahsil Ignore By Mp Ranjitsinh Naik Nimbalkar Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..