शिक्षक साताऱ्याचा अन्‌ पगार सोलापुरात! एकही दिवस शाळेत आले नसतानाही मुख्याध्यापकाने हडपला पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schools
शिक्षक साताऱ्याचा अन्‌ पगार सोलापुरात! एकही दिवस शाळेत आले नसतानाही मुख्याध्यापकाने हडपला पगार

शिक्षक साताऱ्याचा अन्‌ पगार सोलापुरात! एकही दिवस शाळेत आले नसतानाही मुख्याध्यापकाने हडपला पगार

सोलापूर : खासगी विनाअनुदानित शाळेवर कधीच न आलेल्या शिक्षकाचा साडेतीन लाख रुपयांचा पगार बनावट स्वाक्षऱ्या करून मुख्याध्यापकानेच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माढा तालुक्यातील आलेगाव (खु) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे याच्यावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या शाळा २० टक्के अनुदानावर आहे.

राज्य सरकारने राज्यातील जवळपास साडेसोळाशे खासगी विनाअनुदानित शाळांना २० व ४० टक्के अनुदान दिले आहे. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील आलेगाव बु. (ता. माढा) येथील सरस्वती विद्यालयाचाही समावेश आहे. मात्र, सागर हणमंत नवगण यांचा शाळेशी कोणताही संबंध नसताना त्यांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्सवरून सरस्वती विद्यालयाने सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून २०११मध्ये मान्यता मिळवली.

सध्या नवगण हे साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल बामणोली, कुडाळ येथे उपशिक्षक आहेत. त्याठिकाणी त्यांचा सेवार्थ आयडी काढताना त्यांचा आधारकार्ड नोकरीसाठी कोणीतरी वापरल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे धाव घेतली. शिक्षण उपसंचालकांनी त्याची माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, वेतन अधीक्षक प्रकाश मिश्रा यांना चौकशीचे आदेश दिले. ते दोघेही सरस्वती माध्यमिक विद्यालय, आलेगाव खु. (ता. माढा) येथे जाऊन पडताळणी केली.

चौकशीअंती नवगण यांची नियुक्ती कोणतीही जाहिरात न देता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता घेतल्याचे समोर आले. नवगण प्रत्यक्षात हजर नसतानाही त्यांच्या झेरॉक्स कागदत्रावरून त्यांना खुल्या प्रवर्गातून १७ डिसेंबर २०११ रोजी विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिल्याचेही दिसून आले. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार वेतन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांनी टेंभुर्णी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक पसार झाल्याचे सांगण्यात आले.

तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांकडून खातरजमा नाहीच

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या २५ मार्च २०२१ रोजीच्या आदेशानुसार नोव्हेंबर २०२० पासून सरस्वती विद्यालयाच्या पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाला २० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर नवगण यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून हजेरीपत्रक बनवून वेतनदेयक तयार करण्यात आले. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२२ या काळातील तीन लाख ५८ हजार ६२३ रुपयांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले. नवगण यांचे जिल्हा बॅंकेच्या भीमानगर शाखेत खाते नसल्याने त्यांचे वेतन शाळेच्या खात्यात जमा झाले. त्या खात्यातून साडेसात लाख रुपये काढून दादासाहेब केचे पतसंस्थेत वर्ग केले. मुख्याध्यापकाने कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्ते असल्याचे सांगितले. पण, त्या रकमेचा कोणताही घोषवारा त्यांनी दिला नाही.

शिक्षण उपसंचालकांच्या पत्रावरून कारवाई

जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, टाकळी (टेंभुर्णी पा. आढेगाव, ता. माढा) संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांनी सागर नवगण यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर शासनाची फसवणूक करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व रक्कम वसूल करावी. नवघण यांची सेवा शालार्थ वेतन प्रणालीतून समाप्ती करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.