सोलापूर : बालविवाहाला मुख्याध्यापकही जबाबदार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाह

सोलापूर : बालविवाहाला मुख्याध्यापकही जबाबदार?

सोलापूर - बालविवाहात सोलापूर हे राज्यात अव्वल स्थानावर असून, ही ओळख पुसण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांबरोबरच जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांवरही सोपविण्याचे शासन स्तरावर विचाराधीन आहे. प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक आहेत, पण ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने एकाच ग्रामसेवकाकडे तीन-चार गावांचा पदभार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सहावी ते अकरावीच्या मुलींच्या पालकांचे प्रबोधन केल्यास ही अनिष्ठ प्रथा रोखू शकते, असा त्यामागील हेतू आहे. सोलापूर जिल्ह्यात जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ पर्यंत जवळपास १४७ बालविवाह रोखण्यात आले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. वास्तविक पाहता, गावस्तरावरील बालविवाह रोखण्यासाठी बालप्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकाला अधिकार आहेत. तालुकास्तरावर तालुक्याचा स्वतंत्र अधिकारी आहे.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा व मंगळवेढ्यासाठी तालुका बालसंरक्षण अधिकारी सध्या नाहीत. दुसरीकडे, जिल्ह्यातील एक हजार १९ ग्रामपंचायतींमध्ये ९५१ ग्रामसेवक असायला हवेत, पण सध्या ११५ ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांवरही आता त्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बालविवाह रोखले आणि मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविल्याच्या कामाची दखल घेऊन झेडपी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल पुरस्कार मिळाला. आज त्याच मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याची गरज असून, शिक्षकांच्या (मुख्याध्यापक) माध्यमातून ही प्रथा थांबविता येणे शक्य आहे. गावात किंवा शहरात बालविवाह होत असल्यास संबंधितांनी १०९८ या चाइल्ड लाइनच्या क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: School Child Marriage Increased In Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top