शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा
शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा

शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा

सोलापूर : कडक उन्हामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरहजेरी वाढत असतानाच प्राथमिक शिक्षण विभागाने संपूर्ण आठवडाभर एप्रिलअखेरपर्यंत शाळा सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत भरविण्याचे आदेश काढले होते. पण, पालकांसह शिक्षक व शिक्षक संघटनांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शाळेची वेळ आता सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: माजीमंत्री सावंत म्हणाले..! शिवसेनेचा मुख्यमंत्री, तरीही अर्थसंकल्पात दहा टक्‍केच निधी

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक शाळा (पहिली ते आठवीपर्यंतच्या) सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरतील, असे आदेशात नमूद केले होते. शासन स्तरावरूनही तसे आदेश प्राप्त झाले होते. मात्र, कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढताना कडक उन्हाळ्याचा विचार त्या आदेशात केला गेला नव्हता. पालकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर शिक्षण विभागाने आदेशात बदल केला आहे. आता सकाळी 7.10 वाजता परिपाठ सुरु होईल. त्यानंतर 7.25 वाजल्यापासून दुपारी साडेबारापर्यंत एकूण नऊ तास घ्यावेत, असे नव्या आदेशात नमूद केले आहे. प्रत्येक तासाची वेळ ही 30 मिनिटांची राहील, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन आदेशाची सर्व गटशिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिकांच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी व मुख्याध्यापकांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तरीही, शाळेची वेळ कमी केल्याने पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: सोलापूर : २३६ कोटींच्या खर्चानंतरही नागरिकांना नाही नियमित पाणी

आदेशातील ठळक बाबी...
- कडक उन्हाळ्यात शाळा पूर्णवेळ भरविण्यास पालकांनी केला विरोध
- आता सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत असेल शाळेची वेळ
- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 100 टक्‍के उपस्थिती बंधनकारक
- शनिवारी व रविवारीही शाळा भरवावी लागणार; साडेनऊ ते दहा यावेळेत मधली सुट्टी
- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात