Solapur : संपकाळातही लाभेना शिवशाहीचा ‘आधार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahi Bus

संपकाळातही लाभेना शिवशाहीचा ‘आधार’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील २० दिवसांपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र, आंदोलनामुळे सोलापूर विभागात एसटीची वाहतूक ही पूर्णतः बंद असल्याने विभागाचे मागील वीस दिवसांपासून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिवशाही बस ही बंद असल्याने सध्या खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत.

दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालय व कर्मचारी कामाच्या ठिकाणी ये-जा करीत असतात. परंतु एसटी बंद असल्याने कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सोलापूर विभागात देखील ३३ शिवशाही बसेस असून, सोलापूर-पुणे, पंढरपूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, अक्कलकोट-पुणे या मार्गावर बसेस धावत असतात. मात्र कोरोना काळात शिवशाही बस बंद होत्या. अन्य बसप्रमाणे शिवशाही बसला परवानगी देण्यात आल्यानंतर २४ तास शिवशाही बस सुरू होत्या.

मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवशाही बस देखील बंद आहेत. सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीचा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वापर करतात. मात्र मागील वीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातून शहरात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांची बसेस बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे. वाहतूक समस्या उद्भवलेली खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांमुळे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे व कामावर गेल्यानंतर घरी वेळेत पोहोचणे शक्‍य होत आहे. एसटीची वाट पाहत ताटकळत राहणे हा विषय हळूहळू संपत आहे. भविष्यात खासगी प्रवासी पुन्हा एसटीकडे वळणे अवघड बनले आहे.

शिवशाही वीस दिवसांपासून बंद

राज्य परिवहन महामंडळातील चालक शिवशाही बसेस चालवित होते. चालक, वाहक, यांत्रिक विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याने एकही शिवशाही बस सोडता आली नाही. अन्य जिल्ह्याप्रमाणे शिवशाही बसेस चालविण्यासाठी खासगी चालकांची मदत घेतली तर शिवशाहीमुळे प्रवाशांची वाहतुक सुरू होवू शकते. शिवशाही बसेसे चालविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top