esakal | धक्कादायक... करमाळा तालुक्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा तुटवडा 
sakal

बोलून बातमी शोधा

Shocking the scarcity of drugs in primary health centers in karmala taluka

अधिकाऱ्यांना सुचना 
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्‍यक त्या सुविधा पुरवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व गरजूंना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुविधा मिळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर 

धक्कादायक... करमाळा तालुक्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा तुटवडा 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : कोरोना रोगाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी नागरिकांना जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने केले जात असताना करमाळा तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी आवश्‍यक गोळ्या-औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून आवश्‍यक त्या सुविधा मिळत नसल्याने आजारी असलेल्या गोरगरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. 
कोरोनाविषयी आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांनी दिलेले असतानाही शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
याबाबत एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलेली माहिती धक्‍कादायक आहे. या कर्मचाऱ्याने सांगितले, की तालुक्‍यात कोर्टी, जेऊर, केम, वरकुटे व साडे अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. येथे पुरेसे डॉक्‍टर नाहीत. आहेत त्या डॉक्‍टरांनकडूनच कामे केली जातात. याशिवाय आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक गरजेचेची देखील गोळ्या-औषधे नाहीत. अनेक गोरगरीब अक्षरशः हात जोडून विनंती करतात, मात्र आम्ही त्यांच्यावर उपचार करू शकत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या गोळ्या उपलब्ध असतील, सर्दी व तापासाठी दिल्या जातात. यापेक्षा जास्त काय होत असेल तर त्या रुग्णाला इतर हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. 
करमाळा तालुक्‍यातील प्रत्येक गावामध्ये पुणे, मुंबई व इतर शहरांतून अनेक लोक आलेले आहेत. या लोकांची तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र याकडेही कोणी लक्ष देण्यास तयार नाही. कोरोनाच्या भीतीने अनेक खासगी हॉस्पिटल थोड्या वेळच उघडली जात आहेत. अशा परिस्थितीत सरकारी दवाखान्याशिवाय या लोकांना कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

आरोग्य केंद्रात औषधेच नाहीत 
प्राथमिक आरोग्य केंद्रांतून गोरगरिबांना कुठल्याच सुविधा मिळत नाहीत. माझ्या गरोदर पत्नीला विहाळ येथील आरोग्य उपकेंद्रात घेऊन गेलो असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उपचार केले नाहीत. उपस्थित कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे काहीही औषधे शिल्लक नसल्याचे सांगितले. 
- धर्मराज हरिभाऊ काळे, तालुकाध्यक्ष, आदिवासी पारधी विकास परिषद, करमाळा 

24 तास डॉक्‍टर द्या 
कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर 24 तास उपलब्ध व्हावेत म्हणून मी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा चांगली मिळाली पाहिजे म्हणून आम्ही वारंवार प्रयत्न करत आहोत. मात्र याची दखल घेतली जात नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे. 
- सविताराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य, कोर्टी, ता. करमाळा 

औषधांची व्यवस्था केली जाईल 
याबाबत तत्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या कानावर हा विषय घालून प्राथमिक आरोग्य केंद्रांत तत्काळ औषधांचा पुरवठा होण्याची व्यवस्था केली जाईल. 
- समीर माने, तहसीलदार, करमाळा