'दामाजी'च्या निवडणुकीत आमदारविरोधी कारखाना परंपरा कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damaji Sugar Factory Director Body

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला धक्का बसला असून या निवडणुकीच्या निकालानंतरही तालुक्याच्या राजकारणात आमदार विरोधी साखर कारखाना ही परंपरा कायम राहिली.

'दामाजी'च्या निवडणुकीत आमदारविरोधी कारखाना परंपरा कायम

मंगळवेढा - श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला धक्का बसला असून या निवडणुकीच्या निकालानंतरही तालुक्याच्या राजकारणात आमदार विरोधी साखर कारखाना ही परंपरा कायम राहिली. दामाजी कारखान्याच्या स्थापनेपासून तत्कालीन आमदार लक्ष्मण ढोबळे, डॉ. राम साळे, स्व.आमदार भालकेंच्या दुसऱ्या टर्ममध्ये साखर कारखान्याचा निकाल विरोधात गेला. त्याप्रमाणे यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली.

दामाजीची निवडणूक प्रारूप मतदार यादीपासून चर्चेत आली. त्यामध्ये जवळपास २५०० सभासद वगळल्यावरून हरकती घेण्यात आल्या त्यामध्ये बहुतांश हरकती मान्य करून बाकीच्‍या हरकती फेटाळण्यात आल्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सलग तीन वर्षे ऊस पुरवठा केला नसल्याच्या कारणावरून समविचारी गटातील अनेक मातब्बर उमेदवार बाद केल्यामुळे ही निवडणूक आणखीनच चर्चेत आली. सत्ताधारी गटाची बांधणी मजबूत होती. प्रचाराचा प्रारंभ करून आमदार समाधान आवताडे हे सत्ता स्थापनेसाठी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या प्रचार यंत्रणेत खंड पडला. नेमकी हीच संधी समविचारी गटाने साधत प्रचाराचा प्रारंभ मोठ्या धुमधडाक्यात केला. समविचारीचे अनेक नेते सत्ताधारी गटावर तुटून पडले. सत्ताधारी गटाबरोबर गतवर्षी असलेल्‍या अनेकांनी यंदा त्यांची साथ सोडत समविचारीचा हात धरला.

प्रचारामध्ये अॅड. नंदकुमार पवार, दामोदर देशमुख, अजित जगताप यांनी कारखान्याच्या गैरकारभारावर प्रकाश टाकला, तर शिवानंद पाटील यांनी कारखानदारी चालवण्यावर भाष्य करून सभासदांचा कौल मागितला. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी गटातून आमदार समाधान आवताडे यांनी सहा वर्षात एकही हंगाम बंद न ठेवता कारखाना चालवला. एफआरपी दिली, सवलतीत साखर, सभासदांना विमा आदी मुद्दे मांडले. त्यांच्या बरोबरीने शशिकांत चव्हाण, प्रा. येताळा भगत, बापू मेटकरी हे समविचारी गटाच्या नेत्यांवर तुटून पडले. समविचारीकडून अक्रियाशील सभासद, कर्मचारी पगार, ऊस बिल-दर, साखर व भंगार विक्री हे मुद्दे सभासदांना पटवून देण्यात यशस्वी ठरले. शिवाय कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाकडे देखील गांभीर्याने पाहिले नाही. आमदार समाधान आवताडे यांना पराभूत करण्यासाठी तालुक्यातील अनेक मातब्बर एकत्र आले. एकट्या आमदार आवताडेंच्या सोबतीला शेवटी चुलत्याने हात दिला, मात्र तरीही विजयापर्यंत जाण्यासाठी अडचण झाली.

सत्ताधारी गटाचे संचालक असलेल्या अनेक गावात आमदारांना कमी मते मिळाली. विद्यमान संचालकांपैकी अनेक चेहरे बदलले काही जुन्‍या चेहऱ्याच्या गावात देखील कमी मते मिळाले. पोटनिवडणुकीच्या पराभवापासून भालके गटाला मरगळ आली होती, परंतु समविचारीच्या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके गटाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. परिचारक गटाने ज्याप्रमाणे आपण पोटनिवडणुकीत किंगमेकर आहोत, त्याच पद्धतीने दामाजी कारखाना निवडणुकीतदेखील किंगमेकर असल्याचे दाखवून देण्यात यशस्वी ठरले.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर परिचारक समर्थकांनी आम्हाला गृहीत धरू नये, असा इशारा दिला होता. तो वास्तव्यात आणून दाखवला. सध्या कार्यक्षेत्रात पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. मात्र कारखानदारी चालवण्यासाठी मागील सभासदांचे थकीत ऊस बिल कर्मचारी पगार याचबरोबर कारखानदारी चालू करण्यासाठी कोट्यावधी रकमेच्या निधीची गरज आहे. परंतु समविचारी गटाचे प्रमुख शिवानंद पाटील हे परिचारकांचे समर्थक असल्यामुळे त्यांना परिचारकांकडून कारखानदारी चालवण्याच्या मार्गदर्शनाचा व त्यांच्याकडील वित्तीय संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात उपलब्ध होणार आहे. बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख यांनी देखील कारखानदारी चालण्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत करण्याचे बोलून दाखवले होते. याच्याशिवाय धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, जिजामाता पतसंस्थेचे रामकृष्ण नागणे, तसेच रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा हे देखील कारखान्याला मदतीचा हात देणार असल्याचे सुतवाच यापूर्वीच केल्यामुळे कारखानदारीला भविष्यात चांगले दिवस येतील असे चित्र सध्यातरी आहे.

Web Title: Shri Sant Damaji Cooperative Sugar Factory Election Mla Oppose Tradition Continues Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top