'दामाजी'साठी ८५.४५ टक्के चुरशीने मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shri sant damaji sugar factory

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज तालुक्यातील 108 मतदान केंद्रावर 28695 पैकी 24521 मतदारांनी हक्क बजावत सरासरी 85.45 टक्के मतदान चुरशीने झाले.

'दामाजी'साठी ८५.४५ टक्के चुरशीने मतदान

मंगळवेढा - श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज तालुक्यातील 108 मतदान केंद्रावर 28695 पैकी 24521 मतदारांनी हक्क बजावत सरासरी 85.45 टक्के मतदान चुरशीने झाले. बंद मतपेठेतील कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता तालुक्यासह जिल्ह्याला लागली असून मतमोजणी 14 जुलै रोजी होणार आहे

मंगळवेढा, मरवडे, भोसे, आंधळगाव, ब्रह्मपुरी या पाच ऊस उत्पादक गटातील 108 केंद्रावर प्रशासनाने 28 हजार 535 सभासदांच्या तर याशिवाय संस्था मतदारसंघातील 160 मतदारासाठी मंगळवेढ्यात मतदान केंद्र ठेवण्यात आले. त्यामध्ये इतक्या 24521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ब्रह्मपुरी गटात 6142 पैकी 5129 मरवडे गटात 6200 पैकी 5365, भोसे गटात 6036 पैकी 5251, आंधळगाव गटात 5520 पैकी 4726 मंगळवेढा गटात 4637 पैकी 3896 व संस्था मतदार संघातून 160 पैकी 154 इतके मतदान झाले आहे. निवडणूक सत्ताधारी आ. आवताडे यांच्या गटाविरोधात तालुक्यातील सर्व नेते समविचारी गटाच्या रूपाने एकत्रित आले. कामगाराने देखील ऐनवेळी आंदोलनाच्या हत्यार उपसून सत्ताधारी गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी चुलते बबनराव आवताडे यांनी पुतण्याच्या पाठीवर हात ठेवल्यामुळे आणखीन सत्ताधारी गट मजबूत झाला.

सत्ताधारी गटातून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अशोक केदार हे यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. संस्था मतदारसंघात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या विरोधात जगन्नाथ रेवे यांचा उमेदवारी अर्ज सत्ताधारी गटाकडून होता. मात्र, प्रचाराच्या अंतिम दिवशी सिद्धेश्वर आवताडे हे सत्ताधारी गटाच्या व्यासपीठावर आल्यामुळे या मतदारसंघातून विजयी होणारी जागा ही देखील सत्ताधारी गटाची होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी गटाने सध्या दोन जागा पदरात पाडून घेतल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाकडून परगावी असलेले मतदार देखील आणण्यात आले. मतदानासाठी सभासदांना ने-आण करण्यासाठी गाव पातळीवर गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे आपापल्या पॅनलला मतदान करून घेण्यासाठी स्थानिक गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांनी पावसाची रिपरिप सुरू असताना प्रयत्न करून त्या सभासदांचे मतदान करून घेतले. मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला.

सभासदांचा आमच्या सहा वर्षाच्या कारभारावर विश्वास असून त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असेल.

- आ. समाधान आवताडे, अध्यक्ष दामाजी शुगर

सुरुवातीच्या काळात समविचारी असलेल्या आघाडी नंतरच्या काळात अविचारी होत गेल्यामुळे कौटुंबिक विषय बाजूला ठेवून आम्ही सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

- सिद्धेश्वर अवताडे, अपक्ष उमेदवार सहकारी संस्था

संस्था वाचवण्यासाठी ही निवडणूक सभासदाने हातात घेतली. सभासद व कार्यकर्त्यांनी केलेल्या एकजुटीमुळे आमच्या गटाचा विजय 2000 पेक्षा अधिक मताने होणार आहे

- शिवानंद पाटील, समविचारी आघाडी

Web Title: Shri Sant Damaji Sugar Factory Election Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :electionSugar Factory