
श्री दामाजी कारखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ढोबळे हे मंगळवेढ्याचे वीस वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राहिले.
मंगळवेढा : ढोबळेचा शाहू परिवार कुणाचा झेंडा धरणार
मंगळवेढा - श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी आ. समाधान आवताडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केलेल्या समविचारी गटांने भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांना मदतीची गळ घातल्यामुळे ढोबळेचा शाहू परिवार कुणाचा झेंडा धरणार हे लवकर स्पष्ट होणार आहे.
श्री दामाजी कारखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ढोबळे हे मंगळवेढ्याचे वीस वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राहिले असल्याने त्यांनी स्वतःचा गट सहकाराऐवजी शिक्षण क्षेत्रातून शाहू परिवाराच्या निमित्ताने कार्यरत ठेवला. आणि हाच गट अनेक निवडणुकीत निर्णयी भूमिका बजावू लागला. श्री संत दामाजी कारखान्याच्या मागील निवडणुकीत त्यांनी आपला कौल विद्यमान आ. समाधान आवताडे यांच्या पॅनेलला दिला. तो निर्णायक ठरला. त्यामध्ये शाहू परिवाराचे अशोक केदार आणि लक्ष्मण नरोटे दोन उमेदवार निवडून देखील आले. परंतु हुलजंती जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ढोबळे यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा शाहू परिवाराच्या जिव्हारी लागला. त्याबाबतची खंत देखील बहुजन परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल साळुखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
त्यामुळे यंदाच्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत शाहू परिवाराने अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसली तरी विद्यमान संचालक अशोक केदार हे सत्ताधारी गटातून बिनविरोध विजयी झाले असले तरी देखील ढोबळे यांच्या शाहू परीवाराचा कौल आपल्यास मिळावा म्हणून समविचारी गटाने ढोबळे यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपल्या गटाला हिरवा कंदील देण्याचे आवाहन केले. यावेळी गटाचे शिवानंद पाटील, अजित जगताप, औदुंबर वाडदेकर, भारत पाटील, भारत शिंदे, जनार्दन अवघडे उपस्थित होते. त्यामुळे एका बाजूला समविचारी गटातील जुन्या सहकाऱ्यांनी घातलेली गळ व दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदाराचा गट नेमका कुणाचा झेंडा भाजप नेते लक्ष्मण ढोबळे घेणार याची उत्सुकता लागली.
Web Title: Shri Sant Damaji Sugar Factoty Election Politics Bjp Leader Lakshman Dhobale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..