Pandharpur Bhakt Niwas : पंढरपूर येथे श्री श्रीधर भक्त निवास उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur Bhakt Niwas

Pandharpur Bhakt Niwas : पंढरपूर येथे श्री श्रीधर भक्त निवास उभारणार

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर आणि शहरातील इतर धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूरमध्ये लवकरच सर्व सुविधांसह श्री श्रीधर भक्त निवास सज्ज होणार आहे. त्याचे भूमिपूजन शुक्रवारी झालरियाचे पीठाधिपती जगद््गुरु रामानुजाचार्य स्वामीजी श्री घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि इतर संतांच्या उपस्थितीत झाले. पंढरपुरात उत्सव म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्वामीजी महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने झालेल्या भूमिपूजनाचे मुख्य यजमान एलन मानधना कुटुंबातील राजेश माहेश्वरी आणि नवीन माहेश्वरी होते. नवीन माहेश्वरी यांनी सपत्नीक पूजा केली. घनश्यामाचार्यजी महाराजांनी देवाला प्रार्थना करून पहिली वीट ठेवली आणि चांदीचा खोऱ्या वापरून भूमिपूजनाचा कार्यक्रमास सुरवात झाली, अशी माहिती व्यवस्थापक योगेश शर्मा यांनी दिली.

घनश्यामाचार्यजी महाराज म्हणाले की, मुलांमध्ये चांगले गुण आईमुळे असतात आणि रजोगुण वडिलांमुळे असतात. आईची वैष्णव संस्कृती धर्माशी जोडून सेवाकार्य करण्याची प्रेरणा देते. तुमची देव आणि गुरुंवर श्रद्धा असल्याने तुम्हाला त्याचे फळ मिळेल. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्याचे कामही भागवत सेवेच्या बरोबरीचे आहे. या भाविकांना निवास व प्रसादाची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी येथे भक्त निवास बांधण्यात येत आहे.

राजेश माहेश्वरी म्हणाले की, गुरू महाराजांच्या कृपेने एलन कुटुंब पुढे जात असून आमची सर्व कामे होत आहेत आम्ही त्यांना सर्वस्व अर्पण करतो. कामाची सुरवात लहान असते आणि त्याचा शेवट विचार करण्यापलीकडचा असतो. चित्रकूटमध्ये श्रीधर भक्त निवासाचे काम सुरू झाले तेव्हा ते मर्यादित जागेत बांधले जाणार होते. पण काम पुढे गेले आणि आज ते भाविकांच्या सोयीचे झाले आहे. गुरू महाराजांचे चिंतन हे सदैव भक्तांच्या कल्याणासाठी असते, त्यांच्यासाठी ते पठण विधी करत राहतात. दास हनुमान, चित्रकूटमध्ये सर्व सुविधांनीयुक्त इमारत बांधली असूनही गुरू महाराज जेथे श्रीधरधाम बांधण्यापूर्वी राहत होते त्याच साध्या खोलीत आजही राहतात. अशा गुरुजींचे शिष्य असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

आमदार समाधान आवताडे, श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी पुदलवाड, मदन महाराज, पोलिस अधिकारी अरुण फुगे यांच्यासह पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतील शेकडो भाविक पंढरपूरला पोहोचले होते. कार्यक्रमानंतर महाप्रसाद झाला, त्यात हजारो लोकांनी लाभ घेतला.

असे असेल पंढरपूरचे श्रीधरधाम

हे बांधकाम परमपूज्य स्वामीजी श्री घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या प्रेरणेने आणि एलन मानधना परिवाराच्या मातोश्री श्रीमती कृष्णादेवी मानधना यांच्या परवानगीने कुटुंबातील डॉ. गोविंद माहेश्वरी, राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी आणि डॉ. ब्रिजेश माहेश्वरी यांच्याकडून केले जाणार आहे. तळमजल्यासह पाच मजली इमारत येथे बांधण्यात येणार असून, त्यामध्ये सर्व सुविधांसह ५१ खोल्या असतील. प्रत्येक खोलीत तीन लोकांची राहण्याची सोय असेल. धार्मिक कार्यक्रमांसाठी एक हॉल असेल आणि गोठ्याचीही व्यवस्था असेल. यासोबतच वाहनतळासाठीही जागा उपलब्ध होणार आहे.