
नेत्रदानातून एकाच वेळी तिघांना दृष्टी
सोलापूर - एका नेत्रदात्याच्या नेत्रदानातून एकाचवेळी तिघांना दृष्टी देण्याची किमया नव्या तंत्रज्ञानातून केली आहे. सोलापुरात या प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र येथील जोग नेत्र रुग्णालय, नेत्रदान व नेत्ररोपण केंद्राने करून दाखवली आहे. पहिल्या शस्त्रक्रियेत एका दात्याच्या नेत्राने तिघांना दृष्टी मिळाली आहे.
पूर्वी पारंपरिक पद्धतीत कॉर्नियल ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेत एकाच व्यक्तीला दृष्टी मिळत असे. त्यानंतर मागील काही वर्षांत नेत्र शस्त्रक्रिया तंत्रात नवे बदल झाले. त्यानुसार आता कॉर्निया (बाह्यपटल)चे पाच थर असल्याने ते थर किंवा पदर वेगळे करण्याचे तंत्र विकसित झाले. हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट व मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटल या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये या तंत्राचा उपयोग सुरू झाला. त्यानंतर सोलापुरात नेत्र शल्यतज्ज्ञ डॉ. तन्वंगी जोग यांनी या प्रकाराची पहिली शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेला लॅमेलार केरॅटोप्लास्टी असे नाव आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट व दोन ते तीन तास चालणारी आहे. नेत्रदात्याचा कॉर्निया काढल्यानंतर आठ ते दहा दिवस केमिकलच्या मदतीने सुरक्षित ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे याच कालावधीत दृष्टी आवश्यक असणारे लाभार्थी वेळेत मिळणे महत्त्वाचे ठरते.
सोलापुरात ही पहिली शस्त्रक्रिया एका दात्याने मरणोत्तर नेत्रदान झाल्याने होऊ शकली. या दात्याचा डोळ्यातील कॉर्निया काढल्यानंतर तत्काळ गरजूंना पाचारण करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील एका तरुणीला लहानपणी दोन्ही डोळ्यांचे अंधत्व आल्याने तिला दृष्टी देण्यात आली. त्यानंतर एका वृद्धास देखील कॉर्निआचा दुसरा थर बसवून त्यांना दृष्टी देण्यात आली. याच नेत्रदानातून एका व्यक्तीला अपघातात डोळा फुटल्याने त्यास दात्याचा स्केरा बसवण्यात आला. याप्रमाणे एका नेत्रदात्याच्या नेत्रदानातून तिघांना दृष्टिदान केले गेले.
काय आहे नवे तंत्र?
नेत्रदात्याचा कॉर्निया (बाह्यपटल) दानात मिळाल्यानंतर तो सुरक्षित काढून ठेवला जातो
या कॉर्नियाचे थर वेगळे केले जातात
एक थर एका गरजूला शस्त्रक्रियेने प्रत्यारोपित केले जाते
सध्या कॉर्नियाचे तीन थर वेगळे करून तिघांना दृष्टी देणे शक्य
नागरिकांनी काय केले पाहिजे?
मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून द्यावे
कुणा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर नातेवाइकांनी हे दान मृत व्यक्तीद्वारे घडावे म्हणून मरणोत्तर नेत्रदानासाठी डॉक्टरांना कळवले पाहिजे
नेत्रदान म्हणजे डोळ्यातील फक्त बाह्यपटल म्हणजे कॉर्निया काढला जातो म्हणजे पूर्ण डोळा नव्हे, याची जागरूकता आवश्यक
दान हे सर्वश्रेष्ठच असल्याने त्याबाबत कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये
Web Title: Sight For Three At The Same Time Through Eye Donation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..