अबब! शेतकऱ्यांच्या थकबाकीवर महावितरणने लावला 1600 कोटींचा दंड-व्याज | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण
अबब! शेतकऱ्यांच्या थकबाकीवर महावितरणने लावला 1600 कोटींचा दंड-व्याज

अबब! शेतकऱ्यांच्या थकबाकीवर महावितरणने लावला 1600 कोटींचा दंड-व्याज

सोलापूर : आर्थिक स्थिती बिकट झाल्याने महावितरणने (MSEDCL) थकबाकी वसुलीची मोहीम कडक केली असून, यंत्रणा दुरुस्तीसाठीही निकष लावला आहे. थकबाकी नसलेल्या गावांमध्येच दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. तत्पूर्वी, शेतकऱ्यांकडील शेतीपंपाच्या 6 हजार 80 कोटींच्या थकबाकीवर महावितरणने तब्बल 1600 कोटींचा दंड व व्याज लावल्याची बाब समोर आली आहे. थकबाकी वसुलीसाठी आता तो दंड माफ करून मूळ थकबाकीतील 50 टक्‍के रक्‍कम भरून कृषी धोरण (Agricultural Policy) योजनेतून उर्वरित 50 टक्‍के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. (Sixteen hundred crore interest and penalty was imposed on farmers' electricity bill arrears)

हेही वाचा: कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष

जिल्ह्यातील विजेची विशेषत: शेतीपंपाची थकबाकी वसुलीसाठी बारामती (Baramati) मंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे (Sunil Pawde) यांनी 'एक दिवस, एक गाव' उपक्रम हाती घेतला. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तो सुरू असून शेतीपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी तो सहाय्यभूत ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 279 गावांमध्ये या उपक्रमांतर्गत यंत्रणा दुरुस्तीची कामे झाली. त्यात सोलापूर ग्रामीण विभागातील 63, पंढरपूर (Pandharpur) 43, बार्शी (Barshi) 46 व अकलूज (Akluj) विभागातील 24 गावांमध्येही हा उपक्रम राबविला. आता 177 गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. नियोजित गावांमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह दुरुस्ती कामे करण्यासाठी ठेकेदार तथा त्यांचे कर्मचारी जातात. त्यांच्याकडे तारा, किटकॅट, वितरण पेट्या, विजेचे खांब, रोहित्राचे ऑईल असे यंत्रणा दुरुस्तीचे साहित्य दिले जाते. तारांचा झोळ काढणे, खांबांना ताण देणे, आवश्‍यक तिथे खांब उभारणे, गंजलेल्या रोहित्र पेट्या बदलणे, किटकॅट, स्पेसर्स बसविणे अशी कामे केली जात आहेत. मात्र, ज्या गावांची थकबाकी काहीच नाही किंवा खूपच कमी आहे, अशा गावांचीच या उपक्रमात निवड होते.

सहा हजार कोटी नव्हे, अडीच हजार कोटीच भरा

कृषी पंपाच्या थकबाकीत सोलापूर (Solapur) जिल्हा महाराष्ट्रात (Maharashtra) आघाडीवर असून, शेतकऱ्यांच्या थकबाकी मुक्तीसाठी महाराष्ट्र सरकार व महावितरणने कृषी धोरण-2020 आणले. त्यानुसार जिल्ह्यातील सहा हजार 80 कोटींच्या थकबाकीपैकी दंड-व्याज माफ करून तीन हजार 600 कोटीच शेतकऱ्यांकडे थकबाकी उरते. कृषी धोरणानुसार थकबाकीच्या 50 टक्के रक्कम व सप्टेंबरनंतरचे चालू बिल (875 कोटी) असे एकूण दोन हजार 675 कोटी रुपयेच शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. आता या योजनेची मुदत 80 दिवस राहिली असून आतापर्यंत केवळ 196 कोटींचाच भरणा झाला आहे. मार्चनंतर हे धोरण बंद झाल्यानंतर 100 टक्‍के थकबाकी भरावी लागणार आहे.

हेही वाचा: सरकारचे नवे आदेश! महापालिकांमधील 'या' अधिकाऱ्यांची मागवली माहिती

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी धोरणाचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे. या योजनेसाठी 80 दिवस शिल्लक असून, थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे. वीजबिल भरलेल्यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही.

- संतोष सांगळे (Santosh Sangle), अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top