एका नव्या वळणावर..!

अतुलचंद्र कुलकर्णी एनआयएचे अतिरिक्त पोलीस महासंचालक
Solapur Abhay Diwanji write ips atulchandra kulkrani is appointed additional director of general in NIA
Solapur Abhay Diwanji write ips atulchandra kulkrani is appointed additional director of general in NIAsakal

नेहमीच्या सवयीनुसार मोबाईलमधील काही नावे चाळत होतो... कामाच्या व्यस्ततेतून थोडी उसंत होती... न विसरता काही मित्रांना सहजपणे म्हणजे ‘तुमची आठवण आली‘ असे म्हणत स्वभावधर्मानुसार फोन करणे हे नेहमीचेच ! कालच सायंकाळी महाराष्ट्राचे तुरुंग विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांचे नाव दिसले... केला फोन... थोड्याफार ख्यालीखुशालीच्या गप्पा झाल्या... आणि संध्याकाळी ‘सकाळ'च्या ग्रुपवर श्री. कुलकर्णी सरांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) झाल्याचे समजले... पुन्हा फोन करण्याची एक संधी साधून कॉल केला... परंतु एंगेज होता... हाती लागलेल्या त्यांच्या आॅर्डरची कॉपी त्यांनाच पाठविली... याच दरम्यान माझ्याशी संबंधित तब्बल पन्नासएक आयपीएस अधिकाऱ्यांना मित्रवर्य अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या नव्या नियुक्तीच्या आॅर्डरची कॉपी पाठविली होती... बहुतेक यातील काहींनी कुलकर्णी सरांना फोन लावला असावा, त्यामुळे मला एंगेज लागत असावा... थोड्याच वेळात प्रतिसाद मिळाला... सरकारी कामात बदल्या, बढत्या होतच असतात. परंतु या वेगळ्या नव्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचा अभिमान व्यक्त केला... माझ्या दृष्टीने ही मोठीच बातमी होती...

माझ्या पोतडीत श्री. कुलकर्णी सरांबद्दल खच्चून मजकूर भरलेला होता... परंतु शब्दमर्यादेमुळे थोडक्यात त्यांच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारी बातमी केली. आज पहिल्या पानावर बातमी आल्यानंतर आमच्या दोघातील कॉमन मित्रांशी फोनवर संवाद झाला. सोलापूरवासिय असल्याचा सार्थ अभिमान वाटण्यासारखीच ही गोष्ट होती.

श्री. कुलकर्णी साहेब मूळचे अरण (ता. माढा) येथील... १९९० मध्ये ते थेट आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) झालेले... त्यावेळी मी सोलापूर आकाशवाणीत नैमित्तीक निवेदक म्हणून काम करत होतो... त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता... गप्पा खूपच रंगल्या होत्या... पुढे त्यांनी नांदेड, जालना, जळगाव, बुलढाणा, मुंबई, भंडारा, नागपूर येथे विविध पदांवर काम केले. पोलिस अधीक्षक असताना सामान्य पोलिसांच्या कुटुंबांच्या कल्याणाचा विचार करणारा हा सहृदयी अधिकारी... नंतर त्यांनी केंद्रीय गुप्तचर विभागात (आयबी) तब्बल अकरा वर्षे काम केले. दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) असताना प्रवाहाबाहेर जाणाऱ्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्याची कसोटी, सीआयडीचे प्रमुख असताना पालघर येथे साधूवर झालेल्या समूह हल्याचा तपास केल्याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाची मला आठवण झाली. खात्यात चांगली प्रतिमा असलेल्यांची खूपच वानवा असते... पण कुलकर्णी सरांबद्दल प्रत्येकजण आदरयुक्त भाषेतच बोलतो हे विशेष !

आयबीमध्ये असताना कुलकर्णी सरांना सोलापूरच्याच दत्ता पडसलगीकर (निवृत्त पोलिस आयुक्त, मुंबई) यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. निवृत्तीनंतर पडसगीकरसाहेब केंद्रात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोभाल यांच्यासोबत काम करत आहेत. अशा दोन्ही सोलापूरकरांचा अभिमान वाटतो. या दोघांशी कधीही मनमोकळेपणाने गप्पा मारण्याचा आनंद मिळणे ही मोठी जमेची बाजू ! याहून अजून एक तिसऱ्या सोलापूरकरांचा उल्लेख करायचा राहिला... सोलापुरातील पोटफाडी चौकालगत असलेल्या समर्थनगरात राहणाऱ्या विद्या कुलकर्णी (तामिळनाडू केडरच्या आयपीएस) यांची नुकतीच सीबीआयच्या संयुक्त संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांनी लावलेल्या अटकेपार झेंड्याची ई-सकाळवर सविस्तर विवेचन करण्याची संधी दवडली नव्हती... त्या आयपीएस झाल्यावर त्यावेळी म्हणजे २००२ मध्ये ‘सकाऴ'साठी पहिली मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती.

मोबाईलमधील नावांच्या लिस्टवर एक नजर टाकण्याची खोड कधीही चांगली असल्याचा नेहमीच अनुभव येत असतो. पितृतुल्य मार्गदर्शक मधुकर भावे, लाखो अंधजनांना पुन्हा जग दाखविणारे पितृतुल्य डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री प्रतापराव पवार, डॉ. डी. वाय. पाटीलदादा, डॉ. पी. डी. पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सौदी अरेबियाचे भारताचे मा. राजदूत अहमद जावेद, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, लोकपाल दिनेशकुमार जैन, संरक्षण विभागाचे केंद्रीय सचिव अपूर्व चंद्रा, प्रविणसिंह परदेशी, एमपीएससीचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (यादी फारच मोठी आहे) अशी महनीय व्यक्तींची यादी आपल्या फोनलिस्टमध्ये असल्याचा अन् त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी वाटते. (खास मित्र (स्व.) खासदार राजीव सातव याचे स्मरण होतेच) ही दिग्गज मंडळी माझ्या आग्रहाखातर सोलापुरात येतात... भेटतात... वाफाळलेल्या कॉफीच्या (कॉफी विथ सकाळ) घोटांबरोबर गप्पांची मैफल रंगते... आणि हो माझ्या सर्व सहकाऱ्यांना या गप्पांचा आणि गप्पांच्या अनुभवातून आयुष्याच्या उभारणीचा लाभ मिळावा याचेही प्रयत्न असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com