Solapur : ‘भाचे कंपनी’ला ‘मामा’ बनविणारी ‘देशमुखी रचना’, भाजप काढणार मागील तीन वर्षांचा वचपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation

Solapur : ‘भाचे कंपनी’ला ‘मामा’ बनविणारी ‘देशमुखी रचना’, भाजप काढणार मागील तीन वर्षांचा वचपा

सोलापूर : नुकतेच महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये चार सदस्यीय की तीन सदस्यीय प्रभाग, याबाबत स्पष्टता नसली तरी नव्याने प्रभाग रचना होणार आहे. यापूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत राष्ट्रवादीपेक्षा ‘कोठे’ प्रभावी रचना पाहायला मिळाली होती. खास करून ‘उत्तर’वर डोळा ठेवून भाजपच्या सर्वच प्रभागांची फोडाफोड झाली होती. आता मात्र मागील तीन वर्षातील वचपा भाजप काढणार असून, भाचे कंपनीला ‘मामा’ बनविणारी प्रभाग रचना आमदार विजयकुमार देशमुखांकडून आखली जात आहे.

महापालिकेच्या २०२२ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कामकाजाला प्रत्यक्षात २५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली. महाविकास आघाडी सरकारने सुरवातीला दोनचा प्रभाग निश्चित केला. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांचे एकमत झाले नसल्याने महिनाभरात नवीन आदेश काढत तीनची प्रभाग रचना जाहीर केली. निवडणुकीपूर्वीच्या तयारीला तब्बल सव्वा वर्ष लागले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या तुलनेत राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली होती. बहुतांश महापालिकेतील प्रभाग रचना या राष्ट्रवादी प्रभावी होत्या.

त्यात सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाला बळकटी येण्यासाठी संपूर्ण धुरा महेश कोठे यांच्यावर सोपविली होती. उत्तर मतदारसंघावर डोळा असलेल्या सर्व विरोधी नेत्यांचा एक स्वतंत्र गट तयार झाला होता. या गटाला माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भाचे गट म्हणून ओळखले जात होते. उत्तरमध्ये भाजपला मारक आणि कोठेंना पूरक अशी राजकीय व्यूहरचना आखली गेली होती. यादरम्यान महापालिका निवडणुकीचे निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाने आमदार विजयकुमार देखमुखांची नियुक्ती केली. कोठेंच्या व्यूहरचनेवर भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचा अभ्यास चालू असताना राज्यात सत्ता बदलली आणि आता नव्याने प्रभाग रचना बनविण्याचे आदेशही प्राप्त झाले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून भाचे कंपनीच्या सुरू असलेल्या राजकीय वाटचालीला अचानक ब्रेक लागला आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. पक्षात येण्यासाठी इच्छुक असलेले नेते आता नव्या प्रभाग रचनेनंतरचा मुहूर्त काढणार आहेत. नव्या प्रभाग रचनेत तीन सदस्यी प्रभाग असो की चार सदस्यी प्रभाग, आमदार देशमुखांविरोधात तयार झालेल्या भाचे गटाला मामा बनविण्याची रणनीती भाजपची असणार, हे खरे. भाजपच्या व्यूहरचनेमुळे कुणाला दिलासा मिळणार आणि कुणाला दणका बसणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.