Solapur : भीमाची पहिली उचल 2 हजार 600 रुपये राहील : खा धनंजय महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खा धनंजय महाडिक

Solapur : भीमाची पहिली उचल 2 हजार 600 रुपये राहील : खा धनंजय महाडिक

मोहोळ : चालू वर्षी खोडवा उसाचे प्रमाण जादा आहे, तसेच थंडीही वाढली आहे, त्यामुळे सरासरी उतारा 11 मिळण्याची शक्यता आहे. 11 उतारा मिळाला तर भिमाची पहिली उचल प्रति टन 2 हजार 600 रुपये राहील. सध्या गाळप सुरू असलेल्या उसाची पहिली उचल 2 हजार 200 देणार असून, या पूर्वीच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची सर्व पूर्ती केली आहे. या गळीत हंगामात इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. शेतकरी हित लक्षात घेऊन विरोधकांनी भिमा ची निवडणूक बिनविरोध करावी असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष खा धनंजय महाडिक यांनी केले.

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्या साठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे पुळुज येथील खा महाडिक यांच्या शेडवर आयोजन केले होते त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याने या निवडणुकीत जाहीरनामा नाहीच. सध्या केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. सभासदांनी कुठेही ऊस वजन करावा व भिमाच्या काटयावर आणावा वजनात फरक पडला तर एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ.

विरोधकांचा खरपूस समाचार घेताना खासदार महाडिक म्हणाले, ज्यांनी सहकारी साखर कारखाने खाजगी केले तेच आता म्हणतायेत की सहकार टिकला पाहिजे म्हणून मेळावे घेत आहेत हा कुठला न्याय.आम्ही विरोधकांना चांगली वागणूक दिली असून त्यांचे सर्व अधिकार अबाधित आहेत. आपल्याला पंधरा संचालक निवडावयाचे आहेत. संधी ही प्रत्येकाला मिळत असते. कुणीही नाराज होऊ नये थोडे थांबावे लागेल. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्यात त्यांचा नक्की विचार केला जाईल. शेतकऱ्यांची थकीत एफआरपी कामगारांचे देयके ही दिली त्यामुळे सभासद आमच्या बरोबर आहेत. विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून गाठीभेटीला सुरुवात करावी.

जळीत उसाचे प्रतिटन दीडशे रुपये कपात केली होती. मात्र त्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला असून, ते कपात केलेले पैसे सभासदांना परत मिळणार आहेत. विरोधका कडे कारखान्यावर कर्ज झाले व भ्रष्टाचार हे दोनच मुद्दे आहेत. सध्या ताकदवान मंडळी आमच्या बरोबर आहेत. विरोधका कडे मुद्दे नसल्याने घरात बैठका घेण्याची वेळ आली आहे. जी मंडळी गैरसमजुती मुळे आमच्या पासून दूर गेली आहे त्यांनी परत यावे, त्यांच्यासाठी आमची दारे कायम उघडी आहेत. भीमा परिवार ताकतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

आम्ही यापूर्वी विरोधकांना कारखाना बिनविरोध दिला होता, तो त्यांनी आता मोठे मन करून बिनविरोध करावा त्या माध्यमातुन शेतकरी व संस्थेचे हित जोपासावे. विरोधकांच्या कारखान्यावर ही कर्ज होते ते त्यांनी फेडले, तेच आम्ही करतोय. कर्जाची चिंता सभासदासह कुणीही करू नये. यावेळी युवा नेते विश्वजीत महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप, सोमेश क्षीरसागर, शिवाजी गुंड, तानाजी गुंड, सतीश काळे, सर्जेराव चवरे, धोंडीबा उन्हाळे, राजू बाबर, राजेंद्र टेकळे, पांडुरंग ताटे, मानाजी माने, सुनील चव्हाण, विकी देशमुख, चरणराज चवरे, रमेश माने, भीमराव वसेकर, पद्माकर देशमुख, वीरसेन देशमुख, प्रदीप निर्मळ, तात्या पाटील, छगन पवार, अॅड. अजित चौधरी आधीसह गावोगावचे दोन ते अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित होते.