Solapur : भीमा च्या निकालामुळे तिसऱ्या चिमणीचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वराज महाडिक

Solapur : भीमा च्या निकालामुळे तिसऱ्या चिमणीचा मार्ग मोकळा

मोहोळ : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने विरोधी गटाला चारी मुंड्या चित करीत आपलेच वर्चस्व कायम राखले. दरम्यान माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दरम्यान भिमाची पहिली चिमणी चाळीस वर्षांपूर्वी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व भीमराव( दादा ) महाडिक यांनी उभी केली, दुसरी चिमणी खा धनंजय महाडिक यांनी विस्तारी करणाच्या माध्यमातून उभी केली, तर तिसरी चिमणी खा महाडिक यांचे सुपुत्र नूतन संचालक विश्वराज महाडिक हे इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून उभी करणार असल्याचे त्यांनी प्रचारा दरम्यान सांगितले. त्यामुळे आता तिसऱ्या चिमणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे फार मोठी निवडणूक नाही. मात्र खा. महाडिक यांच्या विरोधातील दोन माजी आमदारांनी ती निवडणूक हायजॅक केली. खा. महाडिक हे राज्यसभेचे खासदार आहेत व ते केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्याच बरोबर त्यांचे सुपुत्र व उच्च शिक्षा विभुषीत विश्वराज महाडिक हे अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाचे पदवीधर असून, त्यांना एक कोटीचे शासनाचे पॅकेज होते. मात्र ते सोडून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले .असे कुठेही शक्य होत नसते, पण विश्वराज महाडिक त्याला अपवाद आहेत.

भीमा कारखान्याच्या या निकालामुळे मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा या तिन्ही तालुक्यातील राजकीय समीकरणे मात्र बदलली. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद या निवडणुकात खा महाडिक हे संपूर्ण ताकदीनीशी उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ज्या ठिकाणी विकास हा मुद्दा आहे त्या ठिकाणी पक्ष नसतो, त्या मुळेच पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ तालुक्यातील विविध पक्षांचे नेते भीमा साठी एकत्र आले. त्यामुळे आता मोहोळ व पंढरपूर तालुक्यात "भीमा पॅटर्न" चालणार अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. गेली पंचवीस वर्षे साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात होता, भिमा वर अध्यक्ष राहिलेल्या स्व. सुधाकर परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांनी कारखान्याच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, ही गोष्ट सभासदांच्या लक्षात आली, त्यामुळे अकरा वर्षांपूर्वी सभासदांनी कारखाना पुन्हा महाडिक यांच्या ताब्यात दिला. त्यांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव झाली त्या मुळेच विस्तारीकरण व सहवीज निर्मिती हे प्रकल्प राबविल्याने सभासदानी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे या निवडणुकीच्या निकालाने अधोरेखित झाले आहे.

राज्यात ऊस दरा बाबत विविध शेतकरी संघटनांची आंदोलने सुरू आहेत. खा. महाडिक यांनी प्रति टन २ हजार ६०० रुपये दर जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे विरोधकांची कोंडी झाली. विरोधका कडे निवडणुकीसाठी सभासदांच्या समोर जाण्यासाठी काहीही मुद्दे नव्हते, केवळ खालच्या पातळीतील व वैयक्तिक टीका, माजी आमदार राजन पाटील यांचे बेताल वक्तव्य, जाहीर न केलेला उसाचा दर व वजन काटया बाबत ठोस न दिलेले आश्वासन यामुळे निवडणूक त्यांना पराभवाकडे घेऊन गेल्याची चर्चा आहे. खा. महाडिक हे स्वतः व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार हा ही विजयाला कारणीभूत ठरला. खा महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक, चिरंजीव पृथ्वीराज महाडिक, वर्ल्ड चॅम्पियन रेसर कृष्णराज महाडिक, चुलत बंधू माजी आमदार अमल महाडिक यांनी प्रत्यक्षात प्रचारात भाग घेऊन सभासदांची जवळीक साधली, त्यामुळे विजय सुकर झाला.