सोलापूर : जलपर्णीवर जैविक नियंत्रण हाच उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलपर्णीवर

सोलापूर : जलपर्णीवर जैविक नियंत्रण हाच उपाय

सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावातील जलपर्णी हटविण्याची मोहीम दोन वर्षांपासून सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जलपर्णी हटता हटत नाही. किती वेळा काढली तरी जलपर्णी पुन्हा फोफावत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षांपासून दिसत आहे. जलपर्णी कायमची नाहीशी करण्यासाठी जैविक नियंत्रण हाच उपाय असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी निनाद शहा यांनी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी तलावाच्या सुशोभीकरणास प्रारंभ होऊन अडीच वर्षे लोटली आहेत. या काळात कोट्यवधी रुपये खर्च करूनही जलपर्णी हटविणे शक्य झाले नाही. किरकोळ सुशोभीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यातच या तलावातील जलपर्णीचा नायनाट होणे महत्त्वाचे होते. मात्र, वरचेवर नव्याने जलपर्णी येतच आहे. याबद्दल पर्यावरणप्रेमी निनाद शहा यांना प्रतिक्रिया विचारली असताा त्यांनी सांगितले की, जलपर्णी ही कॅन्सरच्या पेशीप्रमाणे आहे. एक जरी रोप पाण्यात राहिले तर पुन्हा जलपर्णी उगवणे सरू होते. यावर नियत्रंण आणण्यासाठी जे कीटक जलपर्णी खाऊन गुजराण करतात त्यांना आणून सोडणे हा जैविक उपाय आहे. यापूर्वी सिद्धेश्वर तलावात वाढलेली जलपर्णी रोखण्यासाठी हैदराबाद येथून असे कीटक आणून सोडले होते. यामुळे सिद्धेश्वर तलावातील जलपर्णी हटली आहे.

या तलावात येणारे दूषित पाणी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत जलपर्णी उगवणे थांबणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी अगोदर तलावात येणारे दूषित पाणी रोखणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात या तलावात बोटिंग सुरू करण्यात येणार होती. याबाबतची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे तलाव पुन्हा जलपर्णीने व्यापला जात आहे. सध्या या तलावाचा अर्धाधिक भाग जलपर्णीने व्यापला आहे. अशात बोटिंग सुरू झाले तर तलावाचे सौंदर्य जलपर्णीखाली झाकाेळले असताना बोटिंगसाठी कोणाचीही इच्छा होणार नाही. यामुळे तलावातील बोटिंगचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जनजागृतीची आवश्यकता

धर्मवीर संभाजी तलावात अनेक ठिकाणांहून ड्रेनेजचे पाणी येत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी तलावात सोडणे आवश्यक आहे. तसेच ड्रेनेजच्या पाण्याबरोबरच या परिसरातील सांडपणी, तलावात कपडे धुणे, निर्माल्य टाकणे, या परिसरात पूजा करणे, देवदेवतांच्या मूर्ती टाकणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. या तलावाच्या काठावर घरातील खराब झालेल्या देवदेवतांच्या तसबिरी, मूर्ती आणि पूजेच्या साहित्यांचा ढीग असतो. सध्या तलावाशेजारी भिंतीजवळ देवीची मूर्ती कोणीतरी आणून ठेवली आहे. यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून या तलावाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

जलपर्णी ही स्वच्छ पाण्यात वाढत नाही. फक्त दूषित पाण्यात वाढते. यामुळे तलावात येणारे दूषित पाणी रोखणे आवश्यक आहे. तसेच काढलेली जलपर्णी तलावाजवळच टाकली असेल आणि पावसाच्या पाण्याने किंवा अन्य कारणाने त्या काही रोपटी पाण्यात आली तर पुन्हा रुजतात. यामुळे पुन्हा पुन्हा जलपर्णी येत आहे.

- निनाद शहा, पर्यावरणप्रेमी

Web Title: Solapur Biological Control Water Hyacinth Only Solution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top