
शेटफळ येथील तिन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर शेततळ्यांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मोहोळ: शेटफळ ता मोहोळ येथील तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनेक शेततळ्यांना सुरक्षे साठी लागणारे तार कंपाउंड नसल्याने मोठी अडचण झाली आहे, ही शेततळी म्हणजे मृत्यूचा सापळाच आहेत. कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाय योजना करणे गरजेचे आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागावी यासाठी शासनाने विविध योजना द्वारे शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ दिला आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व त्याच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार शेततळे घेतले जाते. शेततळे पूर्ण झाल्यावर त्यात प्लॅस्टिकचा कागद आच्छादित करून त्यात पाण्याची साठवणुक केली जाते. शेततळ्यात भोवती तार कंपाउंड करून त्याला प्रवेशव्दार असणे गरजेचे आहे, जेणे करून जनावरे व माणसांना आत जाता येऊ नये व कुठलाही धोका होऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश आहे.
मोहोळ तालुक्यात विविध योजनेद्वारे शेतकऱ्यांनी सुमारे बाराशे साठ शेततळी घेतली आहेत. त्यापैकी सुमारे आठशे शेततळ्या भोवती संरक्षणासाठी जाळी मारण्यात आली आहे, उर्वरित शेततळी विना कंपाऊंडची आहेत. शेततळ्या भोवती तार कंपाउंड करणे त्याला प्रवेश द्वार करून प्लॅस्टिकचा कागद आच्छादना साठी सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलेही अनुदान नाही. त्यामुळे शेतकरी सुरक्षेच्या या उपाय योजनेकडे दुर्लक्ष करतात,रोजच्या अर्थीक अडचणी मुळे त्याला हे करणे शक्य होत नाही. शेततळ्यात पाणी सोडल्यानंतर त्यात काही दिवसातच शेवाळे तयार होते. त्यामुळे त्यात एखादे जनावर व माणूस पडला तर त्याला मऊ पणामुळे व शेततळ्यातून धरून वर येण्यासाठी कुठलाच आधार नसल्याने बाहेर पडता येत नाही, परिणामी त्याचा मृत्यू अटळ आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी जनावरे, लहान मुले, महिला व वृद्ध यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे. याची दखल कुणीही घेतली नाही. तेवढ्यापुरती चर्चा होते.
शासनाच्या कृषी विभागाने शेततळ्यांचा सर्वे करून शेततळ्या भोवतीच्या तार कंपाउंड साठी शेतकऱ्याकडून प्रस्ताव घेऊन त्यांना अनुदान द्यावे व सुरक्षेसाठी तार कंपाऊंड मारण्यास प्रोत्साहीत करावे अन्यथा असे मृत्यू होतच राहणार आहेत यात शंका नाही.
Web Title: Solapur Death Three Security Farms
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..