सोलापूर : शहरातील अंतर्गत रस्त्यांची उडाली दैना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 शहरातील अंतर्गत रस्त्यांची उडाली दैना

सोलापूर : शहरातील अंतर्गत रस्त्यांची उडाली दैना

सोलापूर : शहराच्या गावठाण भागातील अंतर्गत रस्त्यांची दैना उडाली असून, अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांहून अधिक वाईट झालेली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही.महापालिका प्रशासनाला मुख्य रस्ते गुळगुळीत झाले की स्मार्ट सिटी होऊ शकते, असा समजच झालेला असावा, असे गावठाण भागातील रस्ते पाहून वाटते. अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रस्त्यांची पूर्णत: दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी मलनिस्सारण योजनेसाठी खोदकाम केल्यानंतर पुन्हा हे रस्ते पूर्ववत केलेले नाहीत, काही रस्त्यांची वर्षानुवर्षे दुरुस्तीच नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांना जोडणारे सर्व रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. लक्ष्मी भाजी मंडईकडे येणारे सर्व रस्ते खोदकाम केल्याने खराब झाले आहेत. या रस्त्यांवरून वाहनचालकांना वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी खडी उखडलेली असून अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.

मग पावसाळ्यात कसे होणार?

शहरात सध्या पाच दिवसांनी पाणी येते म्हणून जास्त वेळ सोडले जाते. त्यामुळे अनेकजण वाहने धुतात. रस्त्यावर पाणी मारतात. मात्र, रस्ते खराब असल्याने चिखल होतो. काही ठिकाणी खडी उखडलेली आहे. अनेक रस्ते मातीयुक्त असल्याने त्या रस्त्यांवरही चिखल होतो. नळाच्या पाण्याने जर इतका चिखल होत असेल तर पावासाळ्यात या रस्त्यांचे काय होणार?

पेंटर चौक ते विजापूर वेस हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी या रस्त्यावर ड्रेनेजसाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ग्राहकांना वाहने पार्किंग करता येत नाहीत. रस्ता खराब असल्याने आमच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

- अब्दुल माडी, मेडिकल दुकान चालक, पेंटर चौक

अंतर्गत भागातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. भाडे घेऊन आतील भागात जाणे नकोसे झाले आहे. खराब रस्त्यामुळे रिक्षाची दुरुस्ती व टायरचा खर्च वाढला आहे. वेळही जास्त लागत असल्याने खराब व निकृष्ट रस्ते असलेल्या परिसरातील भाडे परवडत नाही. प्रशासनाने लक्ष घालून त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.

- अ. रशीद अ. रजाक मैंदर्गी, रिक्षाचालक

‘या’ परिसरातील नागरिक त्रस्त

गावठाण भाग, किल्ला वेस परिसर, मंगळवार बाजार, कुंभार वेस, विजापूर वेस, राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई, बुधवार पेठ या परिसरातील नागरिकांना कुठूनही आले तरी खराब रस्त्यांना तोंड द्यावेच लागते. सर्व बाजूंनी या परिसरात येणारे रस्ते खराब झाले आहेत. काही रस्त्यांची कामे रखडलेली आहेत तर अनेक रस्ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहेत.

Web Title: Solapur Destruction Internal Roads City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top