सोलापूर : बँका अन् पतसंस्थांच्या निवडणुकांचा धुराळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर बँका

सोलापूर : बँका अन् पतसंस्थांच्या निवडणुकांचा धुराळा

सोलापूर: महेश सहकारी बँक, सिद्धेश्वर सहकारी बँक, शिवामृत सहकारी दूध संघ, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यासह जिल्ह्यातील एक हजार ५४६ सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या एक ते दोन महिन्यांत होणार आहेत.

ओबीसी आरक्षणामुळे महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका थांबल्या आहेत. या निवडणुका कधी होतील याची काहीच कल्पना नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठप्प झाल्या असताना जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मात्र आगामी काळात उडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील एक हजार ५४६ सहकारी संस्थांकडे प्रारूप मतदार यादीची मागणी लवकरच केली जाणार आहे. या संस्थांकडून प्रारूप मतदार यादी प्राप्त झाल्यानंतर या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रारूप मतदार यादीवर हरकती व आक्षेप घेऊन त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर या याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेला ३२ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करून या संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मे अखेरीस किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोलापूर शहरातील चौडेश्वरी तोगटवीर सहकारी पतसंस्था, हिंगलाज माता सहकारी पतसंस्था, महापालिका सर्वसाधारण सहकारी पतसंस्था, रमाकांत कर्णिकनगर गृहनिर्माण संस्था, उत्तर सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, मोहोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था, रुक्मिणी को-ऑपरेटिव्ह बँक, पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, सांगोला अर्बन, सद्‌गुरू गहिनीनाथ सहकारी बँक यादेखील मोठ्या संस्थांचा या टप्प्यामध्ये समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने व निर्भीड वातावरणात पार पडाव्यात यासाठी तयारी करण्यात येत आहे. मतदार यादी पासून ते निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व प्रक्रिया सुलभ पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी योग्य ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चार सहकारी साखर कारखाने

विठ्ठल सहकारी साखर कारखाना, संत दामाजी सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना या सहकारी कारखान्यांच्या निवडणुका देखील येत्या एक ते दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होत असल्याने जिल्ह्याचे पक्षीय व गटातटाचे राजकारण ढवळून निघणार आहे.

Web Title: Solapur Election Dust Banks Corporations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top