सोलापूर : हरितक्षेत्रावरून ठरणार ‘क्लायमेट ॲक्शन प्लॅन’

एक लाख वृक्षांची मोजणी पूर्ण; ऑक्सिजन लेव्हल वाढविणाऱ्या कुडुनिंबाची शहरात १० हजार २८५ झाडे
Tree plantation
Tree plantationesakal

सोलापूर : सध्या शहरातील एक लाख ३७३ वृक्षांची मोजणी पूर्ण झाली. यामध्ये १३७ प्रकारचे वृक्ष आढळले असून, विलायती बाभूळ, सुबाभूळ आणि कडुनिंबची झाडे सर्वाधिक आहेत. शहराचे ऑक्सिजन लेव्हल वाढविणाऱ्या कडुनिंबाच्या झाडांची संख्या १० हजार २८५ इतकी आहे. एकूण हरितक्षेत्र पट्ट्यावरूनच ‘क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची रूपरेषा ठरणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

शहराचे हरितस्वास्थ टिकवून तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी दर पाच वर्षांनी वृक्षमोजणी होणे अपेक्षित आहे. शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३६ टक्के हरितक्षेत्राचे प्रमाण हे शहराचे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी योग्य आहे. सोलापूर शहराचे हरितक्षेत्र केवळ सहा टक्के असल्याचा प्राथमिक अंदाज महापालिका उद्यान विभागाने वर्तविला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील वृक्षांची मोजणी झाली नाही. मागील पाच वर्षांत शहरांचे हरितस्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध उपक्रम हाती घेतले.

महापालिका स्तरावर पर्यावरण जनजागृती मोहीम ही एक चळवळ म्हणून उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीदेखील उपलब्ध केला. एक कोटी वृक्षलागवड योजना, ३३ कोटी वृक्षलागवड योजना अशा विविध उपक्रमांतर्गत सोलापूर महापालिकेने लावलेली झाडे व जगवलेली झाडे यांची परिपूर्ण माहिती उद्यान विभागाकडे नाही. ‘आंधळं दळतं अन्‌ कुत्रं पीठ खातं’ अशी स्थिती वृक्ष लागवडीच्या बाबतीत आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच जीआयएस प्रणालीद्वारे शहरातील वृक्षांची मोजणी होत आहे. गेल्या दोन महिन्यांत उद्याने, पार्क आणि वनविहार अशा शहरातील ३५ टक्के भागातील एक लाख झाडांची गणना झाली आहे. यामध्ये १३७ प्रकारची झाडे असून विलायती बाभूळ, सुबाभूळ आणि कडुनिंबाची झाडे सर्वाधिक आहेत.

फळांचीही झाडे अधिक

शहराच्या वृक्षगणनेत शहराचे ऑक्सिजन लेव्हल वाढविणाऱ्या कडुनिंबासह नारळ, सीताफळ या फळांची झाडे अधिकआहेत. आजतागायत आढळलेल्या नारळाच्या झाडांची संख्या दोन हजार ८६१ तर सीताफळाची झाडे दोन हजार ५४२ इतकी आहेत.

ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी ‘या’ झाडांची गरज

पिंपळ, अशोका, वड, बांबू, तुळस, कडुनिंब, औदुंबर, निवडुंग, जांभूळ ही झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. शहराचे ऑक्सिजन लेव्हल वाढविणारे हे वृक्ष आहेत. आतापर्यंत झालेल्या जीआयएस सर्व्हेत कडुनिंब तिसऱ्या स्थानावर आहे.

किमान ३० टक्के हरितक्षेत्र वाढविण्याची गरज

पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांच्या तुलनेत सोलापूरचे हरितक्षेत्र कमी आहे. किमान पातळी गाठण्यासाठी किमान ३० टक्के हरितक्षेत्र वाढविण्याची गरज आहे. सध्या शहरातील उद्याने, आयलॅंड, खासगी व शासकीय जागांतील मोठ्या झाडांची मोजणी करण्यात येत आहे. वयोमान कमी असलेली फुलांची झाडे यातून वगळण्यात आली आहेत.

‘टॉप सेव्हन’ झाडांची संख्या

१. विलायती बाभूळ : १९ हजार २२९

२. सुबाभूळ : १५ हजार ७९६

३. कडुनिंब : १० हजार २८५

४. असूपालव : ३ हजार ४५४

५. नारळ : २ हजार ८५१

६. सीताफळ : २ हजार ५४२

७. सोनमोहर : २ हजार २६५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com