esakal | सोलापूर बाजार समिती ; एप्रिलमध्ये भुसारची आठ कोटींनी,  फळांची 28 कोटींनी घटली उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

apmc solapur

कोरोना संकटात सोलापूर बाजार समिती शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिली आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून समितीच्या वतीने अन्नधान्याच्या दोन हजार किट देण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला पीपीई किट, व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय झाला आहे. पीएम केअर फंड व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला समितीच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. बाजार समितीवर अनेकांची रोजीरोटी अवलंबून असल्याने समितीचे व्यवहार सुरळित होणे आवश्‍यक आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन व बाजार समितीचे व्यवहार सुरळित व्हावेत यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली जाईल. 
- विजयकुमार देशमुख, आमदार तथा सभापती, सोलापूर बाजार समिती 

सोलापूर बाजार समिती ; एप्रिलमध्ये भुसारची आठ कोटींनी,  फळांची 28 कोटींनी घटली उलाढाल 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाउन आणि संचारबंदी करण्यात आली. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सोलापुरात कोरोनाला तर रोखता आलेच नाही; परंतु या सर्वांचा परिणाम सोलापूरच्या अर्थकारणावर झाल्याचे समोर येऊ लागले आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समितीत सोलापूर बाजार समितीचा उल्लेख होतो. याच बाजार समितीचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. फक्‍त एप्रिल महिन्यात सोलापूर बाजार समितीच्या भुसार बाजाराची उलाढाल आठ कोटींनी तर फळे व पालेभाजी बाजाराची उलाढाल 28 कोटींनी (मार्च, एप्रिल 2019 व 2020 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार) घटल्याची माहिती समोर आली आहे. 

मार्च आणि मे महिन्यात घटलेली उलाढाल वेगळीच आहे. बाजार समितीतील लिलाव बंद आहे. कांदा, बेदाणा यासह अन्य महत्त्वाच्या फळभाज्या व फळांच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. बाजार समितीत हातावरचे पोट असणाऱ्या अनेकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 12 एप्रिल ते आजतागायत कोरोनाबाधितांची आणि कोरोनाने मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या वाढतच असतानाच दुसरीकडे बाजार समितीची कोलमडलेली अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. 

सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या लातूर, उस्मानाबाद, नगर, सांगली, सातारा, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणातील व्यापारी, शेतकरी हे सोलापूर बाजार समितीत व्यवहारासाठी येतात. सोलापूरच्या शहरी आणि ग्रामीण अर्थकारणात सोलापूर बाजार समितीचा मोठा वाटा आहे. सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील हाताबाहेर गेलेला कोरोना पाहून आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व शेजारच्या जिल्ह्यातील अनेक नागरिक भुसार, फळे व पालेभाजीसाठी सोलापुरात येण्याचे टाळू लागले आहेत. त्याचा परिणाम बाजार समितीला सहन करावा लागत आहे. हा परिणाम किती झाला आहे? याची माहिती मे आणि जूनमध्ये झालेल्या समितीच्या आर्थिक उलाढालीवरूनच समजणार आहे.

loading image