
रोख पैसे नाहीत, धनादेश घ्या! सोलापूर बाजार समितीतील अडत्यांचा नियम
सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून चार दिवसांत तब्बल चार हजार 439 गाड्यांची आवक झाली आहे. अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत चांगला दर मिळत असल्याने आवक वाढल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी एक हजार 400 रूपये ते कमाल अडीच हजारांपर्यंत दर मिळू लागला आहे. (Solapur Market Yard)
सोलापूर जिल्ह्यासह नगर, नाशिक, पुणे, लातूर, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातून कांद्याची मोठी आवक सोलापूरकडे येत आहे. कलबुर्गी, बागलकोट व विजयपूर येथूनही कांद्याची मोठी आवक आहे. शुक्रवार ते शनिवारी (ता. 29) बाजार समितीत तब्बल एक हजार 267 गाड्या कांद्याची आवक (एक लाख 26 हजार 760 क्विंटल) झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. पाच हजार 299 शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी आणला.
हेही वाचा: प्राचार्यांचे स्पष्टीकरण! "डाएट'कडे डिसले गुरुजी फिरकलेच नाहीत
सोलापूर बाजार समितीत मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातून कांद्याची मोठ्या प्रमाणावर सोलापूर बाजार समितीत कांदा येऊ लागला आहे. बाजार समितीत दररोज पाचशे ते साडेपाचशे गाड्यांचाच लिलाव होत होता. परंतु, आता आवक वाढल्याने आलेल्या कांद्याचा दररोजच्या दररोज लिलाव केला जात आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कांदा लिलाव होतो. कांद्याची आवक वाढल्याने रोखीने पैसे देणे शक्य नसल्याने धनादेश (चेक) जात असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात येत आहे. परंतु, धनादेश देण्याची पद्धत सहकार कायद्यात कुठे आहे, याचे उत्तर बाजार समितीकडे नाही.
रोख पैसे नाहीतच, 15-20 दिवसांचा धनादेश
तीन- साडेतीन महिन्यांपर्यंत खर्च करून सांभाळलेल्या कांद्याची सुरवातीला बियाणे खरेदी करून लागण करणे, फवारणी, खते-औषधे, काढणी, चिरणे आणि बारदाना (पोती) यासाठी मोठा खर्च होतो. संबंधितांचे पैसे देण्यासाठी व पुढील पिकांचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना रोख बिलाची अपेक्षा असते. परंतु, बाजार समितीतील अडत्यांकडून 15 ते 20 दिवसांचा धनादेश दिला जात आहे. पाच ते दहा हजार रुपयांची उचल दिली जाते, मात्र संपूर्ण बिल दिले जात नसल्याची ओरड शेतकरी करू लागले आहेत.
Web Title: Solapur Market Yard Farmer Goods Check
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..