
सोलापुर : माजी आमदार राजन पाटील यांचे पुनर्वसन,तालुक्याचे काय"
मोहोळ: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार ता 30 रोजी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे येण्याने सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या,ठोस असे काहीतरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने घोषणा होईल असे वाटत होते, मात्र फारसे हाती काहीच लागले नाही. परंतु राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते रिचार्ज झाले. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचे दर्शन झाले.
अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले. त्याची उतराई व शेतकरी मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचा दौरा होता. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्या पासून माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही, अद्यापही हे गुऱ्हाळ सुरूच आहे. राज्याच्या चर्चेतला तालुका म्हणून मोहोळ ची ओळख आहे. मात्र सारासार विचार केला तर विकासापासून तालुका आजही मोठ्या प्रमाणात वंचित आहे. उपमुख्यमंत्री पवार हे तालुक्यात आल्यानंतर त्यांना निवेदने देणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यात 80 टक्के प्रश्न हे सिंचनाचे होते. उजनी डावा कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजना, पोखरापूर तलाव हे पाणी स्तोत्र आहेत. मात्र अनेक भागात आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याची सुरुवात पापरी ता मोहोळ पासून झाली. स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमात पापरीच्या जिल्हा परिषद शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. यावेळी मी शाळेला नक्की भेट देईन असा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी मुख्याध्यापकाला दिला होता, तो त्यांनी पापरी येथे येऊन खरा केला. हाऊसफूल्लचा फलक लावणारी पापरी ची शाळा ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. शाळा खोल्या कमी असल्याने अडचण होते शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत पवार यांना निवेदन दिले त्यांनी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना दिली. त्याच दिवशी मुख्याध्यापकांना जिल्हाधिकारी यांनी बोलावून घेऊन प्रस्ताव देण्यास सांगितले संबंधित विभागाचे कर्मचारी येऊन तातडीने जागेची मोजणी ही करून गेले. गेल्या पाच वर्षाचा अडचणीचा प्रश्न उपमुख्यमंत्री पवार यांनी चुटकी सारखा सोडविला मात्र स्थानिकांना हे का जमलं नाही का दिरंगाई झाली हा संशोधनाचा विषय आहे.
जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर,माजी उपसभापती मानाजी माने हे पापरी येथील कार्यक्रमासाठी उपस्थित होते, मात्र त्यानंतर ते अनगर चा मेळावा टाळून थेट अरण ला गेले त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली.जि.प.सदस्य उमेश पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर,माजी उपसभापती मानाजी माने यांनी तालुक्यात घेतलेल्या राजकीय भूमिकेवर अजित पवारांनी कोणतेही भाष्य केले नाही याविषयी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आता झडू लागल्या आहेत. राजकीय आनास्था असल्याने मोहोळ तालुक्याचा विकास खुंटला आहे. शहराचा पाणी प्रश्न गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून तसाच प्रलंबित आहे, महावितरण चे दुसरे कार्यालय मंजुर झाले होते ,मात्र पाठपुरावा न केल्याने ते लॅप्स झाले.
केवळ आश्वासना शिवाय सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडले नाही. मोहोळ तालुक्यात औद्योगिक वसाहत नाही त्याबाबत या मेळाव्यात कोणी साधी मागणीही केली नाही.कोट्यवधीचा निधी येऊन अद्यापही रस्ते तसेच आहेत मग निधी गेला कुठे हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. सिना भोगावती जोड कालव्याचा सर्व्हे, आष्टी उपसा ची अपुरी कामे ही कधी पूर्ण होणार ? याविषयी ठोस काहीच मिळाले नाही.केवळ शक्तिप्रदर्शन मात्र जोरात झाले. माजी आमदार राजन पाटील यांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी तोंड भरुन कौतुक केले राजन पाटील यांच्या पुनर्वसना बाबत चर्चा झाली मात्र तालुक्याचे काय. ज्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या वर्षानुवर्षे हेलपाटे घालूनही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही याचे कुणालाच काही घेणे-देणे नाही.आम्ही शेतकऱ्या साठी काम करतो हेच प्रत्येकाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
Web Title: Solapur Mla Rajan Patil Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..