Solapur : व्यापारी व दलाल मालामाल, शेतकरी कंगाल मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची अवस्था Solapur Mohol taluk grape growers condition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्राक्ष

Solapur : व्यापारी व दलाल मालामाल, शेतकरी कंगाल मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची अवस्था

सकाळ : बुधवार रोजी रात्री मोहोळ तालुक्याच्या काही भागात विजेचा कडकडाट, सोसायटयाचा वारा व पावसाच्या शिडकाव्या मुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले असून, हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतोय की काय याची चिंता त्यांना लागून राहिली आहे.दरम्यान द्राक्ष घडातील मणी तडकु नयेत म्हणुन फवारणीच्या कामाला वेग आला आहे.

मोहोळ तालुक्यात इतर फळबागा बरोबरच द्राक्ष बागांचे क्षेत्र हे विस्तारले आहे. विविध बँकांचे लाखो रुपयांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची लागवड केली आहे. द्राक्ष लागवडीचा मोठा खर्च असतो. सध्या तालुक्यातील अनेक द्राक्ष बागावरील द्राक्ष काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या महिन्या भरापासून द्राक्ष काढण्याची व ती विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक बाहेर राज्यातील व्यापारी येऊन मालाची पाहणी करून, त्यांच्या एजंटा मार्फत द्राक्ष खरेदी करतात.

द्राक्ष उत्तम प्रतीची पिकवण्यासाठी तालुक्यातील पापरी परिसरात मोठी स्पर्धा असते. मात्र व्यापारी चांगली द्राक्ष असूनही कमी दरात पाडून मागतात. शेतकऱ्यांच्या मागे विविध बँकांची, पतसंस्थांची कर्जे, घरातील विवाह सोहळे, शेतीच्या मशागतीचा खर्च असा विविध मोठा खर्च असतो.

त्यामुळे व्यापारी मागेल त्या दरात द्राक्ष द्यावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते. व्यापाऱ्या पेक्षा त्यांनी नेमलेले गावो गावचे दलाल यात "हात धुवून" घेतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी "पोती" ओळखल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.

सुमारे 45 ते 50 रुपये किलो विकणारी द्राक्षे व्यापारी 25 ते 30 रुपये प्रति किलो दराने मागताहेत. शिवाय वातावरणाची भीती घालतात. हवामान अंदाजावर व्यापारी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यापेक्षा हवामान अंदाजाकडे व्यापाऱ्यांचे ज्यादा लक्ष आहे,

त्यामुळे "व्यापारी, दलाल मालामाल शेतकरी कंगाल" अशी अवस्था झाली आहे. बुधवारी रात्रीच्या वाऱ्यामुळे झाडांच्या कैऱ्याही पडल्या आहेत. तर काढण्यासाठी आलेल्या गव्हाच्या पिकाचा "पत्रा" झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागची संकटाची मालिका सुरूच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.