Solapur : मोहोळ तालुक्यात एक लाख 68 हजार नागरिकांनी केले आधार लिंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : मोहोळ तालुक्यात एक लाख 68 हजार नागरिकांनी केले आधार लिंक

मोहोळ : मतदान कार्ड ला आधार कार्ड जोडण्याच्या शासनाच्या मोहिमेला मोहोळ तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून, मंगळवार ता 18 ऑक्टोबर पर्यंत एक लाख 68 हजार 725 जणांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले आधार लिंक करून घेतले आहे. तालुक्यातील सावळेश्वर महसूल मंडळाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून त्या मंडळाचे मंडळाधिकारी धैर्यशील जाधव यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार केल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.

या संदर्भात निवडणूक नायब तहसीलदार लीना खरात यांनी दिलेल्या माहिती नुसार, गेल्या तीन महिन्यापासून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या आधार लिंक च्या प्रक्रियेमुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकीत नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या मोहिमेमुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी अद्यावत होणार आहे, तसेच दुबार व बोगस नावे कमी होणार आहेत. मोहोळ विधानसभा मतदार संघात एकूण तीन लाख 12 हजार 347 मतदार आहेत. त्या पैकी मंगळवार ता 18 ऑक्टोबर पर्यंत एकूण एक लाख 68 हजार 725 नागरिकांनी आधार लिंक केले आहे, त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्याचे काम 54.2 टक्के झाले आहे.

दरम्यान सावळेश्वर मंडळाचे मंडल अधिकारी धैर्यशील जाधव यांनी त्यांच्या अधिपत्या खाली काम करणाऱ्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, कोतवाल यांच्या सहकार्याने मंडळातील सर्व नागरिकांचे आधार लिंकचे काम शंभर टक्के पुर्ण केले. त्यामुळे तहसीलदार बेडसे यांनी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला

खुद्द मोहोळ शहरातील प्रतिसाद कमी

दरम्यान नागरिकांची अनास्था तसेच प्रभागातील राहण्याची ठिकाणे बदलल्याने शहरातील आधार लिंक च्या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी तहसीलदार बेडसे यांनी या शहरातील विविध राजकीय पक्षांच्या, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार ता 18 रोजी बैठक आयोजित केले होती. बैठकीत तहसीलदार बेडसे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रबोधन करण्याचे आवाहन केले. यावेळी रमेश बारसकर, सुशील क्षीरसागर ,सतीश काळे, नागेश बिराजदार, बिलाल शेख, तनवीर शेख, मुस्ताक शेख, ज्ञानेश्वर देशमुख, संतोष माळी, सुरेश गाढवे, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.