Solapur : मोहोळ तालुक्यातील ४३० ट्रान्स्फॉर्मरची वीज खंडित

चालू दोन बिले भरण्याची टांगती तलवार
वीज पुरवठा खंडित
वीज पुरवठा खंडित sakal

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असणाऱ्या विद्युत पंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने तालुक्यातील विविध विद्युत उपकेंद्राच्या अधिपत्याखालील ४३० ट्रान्स्फॉर्मरचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ज्वारी, गहू व हरभऱ्याच्या पेरण्या थांबल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी वीज तोडणी मोहिमेला स्थगिती दिली असली तरी, चालू दोन बिले भरण्याची टांगती तलवार शेतकऱ्यावर आहे.

शेतकऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षापासून विद्युत पंपाची थकबाकी आहे. थकबाकीचे आकडे लाखात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात पाच वर्षात शेतकरी अडचणीत आहे म्हणून बिलाची मागणी केली नव्हती. तसेच महावितरणने कुठलीही शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता पाच अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीला साडेसात अश्वशक्तीचे साडेसात अश्र्व‍शक्तीच्या मोटारीला दहा अश्वशक्तीच्या बिलाची आकारणी केली आहे. त्यामुळे थकबाकीचे आकडे फुगले आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यात विद्युत पंप बंद असतानाही बिलाची आकारणी केल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी मशागती करून तयार ठेवल्या आहेत. मात्र ट्रान्स्फॉर्मर बंद करण्याच्या भीतीने या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. ऊस तोडण्यासाठी विविध साखर कारखान्याकडे विविध भागातून टोळ्या आल्या आहेत. विद्युत पुरवठा बंद केल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. तसेच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान पाच ते सहा गायी आहेत. त्यांच्याही पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाला व शेतात उभा असलेल्या ऊस, मका विविध फळबागा वेलवर्गीय पिकांना पाणी देणे अडचणीचे झाले आहे.

महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

मोहोळ तालुक्यातील एक ही ट्रान्स्फॉर्मर बंद नाही. दोन दिवसापूर्वी तो प्रयोग केला होता. आता सर्व ट्रान्स्फॉर्मर चालू केलेत. दरम्यान, शेतकरी अडचणीत आहे. वीज पुरवठा बंद केल तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, तो त्वरीत सुरू करा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर मंगळवारी बोंबाबोंब अंदोलन सुरू केले आहे.

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याकडे विद्युत पंपाची मोठी थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. तालुक्यात ४ हजार ट्रान्स्फॉर्मर आहेत. त्यापैकी ४३० ट्रान्स्फॉर्मरचा विद्युत पुरवठा बंद केला आहे, अद्याप ही मोहीम सुरूच आहे.

- एस. ए. वनारसे, सहाय्यक अभियंता, महावितरण, मोहोळ

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com