
सोलापूर : कुटुंबकर्ता अंथरुणावर अन् आईचा मोडलाय हात
मरवडे - कुटुंबाच्या चरितार्थासाठी सालगडी म्हणून राबणारा कुटुंबकर्ता अर्धांगवायूमुळे जर्जर होवून सहा वर्षापासून अंथरुणाला खिळलेला, एक मुलगा तोही रोजंदारीवर कामाला, धाकटा मुलगा मतिमंद, वैद्यकीय खर्च आणि मोठ्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी राबणाऱ्या हाताला झालेले फॕक्चर यामुळे कुटुंबावर उपासमारीचे संकट आ वासून उभे आहे. ही वास्तवदर्शी कहाणी आहे, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाचे शेतमजूर हरीभाऊ जाधव या कुटूंबाची!
वडिलोपार्जित एक एकर जमिनीच्या तुकड्यावर कुटूंबाची गुजराण करणे शक्य नसल्यामुळे आयुष्यभर सालगडी म्हणून पंढरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून ते चाकरी करीत होते. मोलमजुरी करुन पत्नी छायाताई यांनी देखील त्यांना साथ दिली. थोरला संतोष तोही रोजंदारी करुन कुटुंबाला हातभार लावतोय पण धाकटा अंकुश मतिमंद. त्यातच संतोषच्या संसारवेलीवर मुलींच्या रुपाने तीन कळ्या फुललेल्या. एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष सुरु असतानाच कुटुंबकर्त्या हरीभाऊ यांना सहा वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि सारे कुटुंब आर्थिक दुष्टचक्रात सापडले. वैद्यकीय उपचारांसाठी अर्धा एकर जमिनीचा तुकडा गमावण्याची वेळ तीन वर्षांपूर्वीच या कुटुंबावर आलेली. हरीभाऊंची जगण्याची उमेद अजूनही कायम असून वाट्टेल ती किंमत सोसून हे कुटुंब शक्य ते सर्व उपचार करीत आहे. छोट्याशा पत्र्याच्या खोलीत हे आठ जणांचे कुटुंब वास्तव्य करीत असून नावापुरताच असलेला हा निवारा उन्हाळ्याच्या दिवसांत खोलीत पाऊल देखील ठेवू देत नाही.
मूलभूत गरजांची पूर्तता देखील होत नाही, अशी स्थिती असूनही या अत्यंत गरीब व गरजू कुटूंबाला तांत्रिक अडचणीमुळे घरकूल अथवा अन्न सुरक्षा योजनेपासून दूर रहावे लागले आहे. पती अर्धांगवायूने अंथरुणावर खिळून, मुलगा मतीमंद, उरलेला अर्धा एकर जमिनीचा तुकडा गमावून बेघर होण्याची आलेली वेळ, व्याजाने घेतलेली रकमेचा परतावा करण्याची विवंचना आणि अशातच कुटुंबाचा भार वाहणाऱ्या छायाताई यांचा हात मोडल्याने अडचणीत भर पडली आहे. गेले पंधरा दिवस संतोषच्या शाळकरी मुलींना शाळेतून मिळालेला तांदूळ, थोड्याशा दाळी एवढ्यावर मोठे कुटूंब चरितार्थ चालवित आहे. शेजारच्या उसनवारीवर दिवस काढताना प्रसंगी गूळ पाण्यावर रात्र काढावी लागल्याची करुण व्यथा छायाताईंनी बोलून दाखविली. याबाबतची माहिती सोशल मीडियांतून समजताच मरवडे व परिसरातील अनेक व्यक्ती व संस्थांनी मदतीसाठी हात पुढे केला असून या कुटुंबाला दुर्दैवी फेऱ्यांतून बाहेर काढण्याचा निर्धार केला असून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यासाठी आर्थिक मदत पाठविण्यासाठी छाया हरी जाधव, SBI बँक, मंगळवेढा शाखा, IFCS कोड SBIN000756, बँक खाते क्र. 34494239139 या खात्यावर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
छायाताई जाधव यांच्या कुटुंबियांवर एकापाठोपाठ एक आघात झाले आहेत. सोसण्या पलिकडची व्यथा, वेदना घेऊन जगणाऱ्या या कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून छत्रपती परिवाराच्या पुढाकाराने एकाच दिवसांत ५१ हजार रुपये निधी व जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचती केली आहे. आणखी मदतीची गरज असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
- सुरेश पवार, संस्थापक, छत्रपती परिवार, मरवडे
Web Title: Solapur Mothers Broken Arm On Family Bed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..