सोलापूर : घरची शेती सांभाळत उपजिल्हाधिकारी झालेले मिनाज मुल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Minaj Mulla become deputy collector

सोलापूर : घरची शेती सांभाळत उपजिल्हाधिकारी झालेले मिनाज मुल्ला

उपळाई बुद्रूक : 'केल्याने होत आहे रे त्यासाठी आधी केलेची पाहिजे'. म्हणतात ते उगीच नव्हे. याची प्रचिती सांगोला येथील मिनाज गनी मुल्ला यांच्या यशातुन दिसुन येते. शिक्षणासाठी असो की स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती कधीही अडसर ठरत नाही हे खोडुन काढत. स्पर्धा परीक्षेसाठी बाहेरगावीच राहुन अभ्यास करावा लागतो. या मानसिकतेला छेद देत. घरची शेती सांभाळत उच्च शिक्षण घेऊन एमपीएससीत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. मुस्लीम समाजातील जिल्ह्यातील दुसरे उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. त्यांची हि प्रेरणादायी यशोगाथा.

उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला सांगतात की, दुष्काळी पट्ट्यातील सांगोला हे गाव. आई वडील दोघेही शेतकरी. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. कोरडवाहू चार एकर शेती होती. आई वडील दोघेही अडाणी तर मोठ्या भावाचे सातवीपर्यंत व बहिणीचे दहावीपर्यंत फक्त शिक्षण झालेले. अशा परिस्थितीत माझे शिक्षण सुरू झाले. शहरात दहा बाय दहाच्या पत्र्यांची खोली होती. वडील सुरुवातीला टेलरिंग (शिवणकाम) काम करत असत. घरात शिक्षणाची कमतरता होती परंतु आई वडिलांची आपल्या मुलांनी खूप शिकाव व मोठं व्हावे ही इच्छा. न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथुन दहावीत 83 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने, त्यामुळे आईवडिलांच्या आशा आकांक्षा आणखी वाढल्या. आपला मुलगा शिक्षणात हुशार आहे.

त्यामुळे त्याला काहीही कमी पडू द्यायच नाही यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. विद्यामंदिर प्रशालामधून बारावीचे शिक्षण चांगल्या 83% गुणांनी पूर्ण झाले. बारावीतील मार्कांच्या जोरावरच एमबीबीएससाठी शासकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, तेथील प्रवेश नाकारत. डिएड करण्याचा निर्णय घेतला.

याकाळात आई वडिलांनी शेती विकण्याची देखील तयारी दाखवली. मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. परंतु हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबाला आणखी आर्थिक पेचात नव्हते टाकायचं. एखतपुर (ता.सांगोला) येथुन डिएड चे शिक्षण पूर्ण करत. राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. परंतु कधीही घरच्या परिस्थितीचा बाऊ केला नाही. मनातून इच्छाशक्ती दांडगी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. याची मला पुर्ण जाणीव होती. त्यासाठी पैश्याअभावी उच्च शिक्षण घेता आले नाही. याची खंत वाटु दिली नाही‌. मिळेल त्या क्षेत्रात समाधान मानून घेत.

आपली वाटचाल सुरू ठेवली. पुढे इंग्लिश मधून 'बीए' चे प्रथम वर्गात शिक्षण पूर्ण केले. हे सर्व शिक्षण घरची शेती सांभाळत पुर्ण केले याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. डिएडनंतर लगेच शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. जवळपास बारावीपर्यंत घरात लाईट देखील नव्हती. रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास केल्याचे फलित या नोकरीमध्ये झालेले दिसत होते.

ज्या क्षेत्रात पाऊल टाकेल तिथे यश मिळत असल्याने, मित्रांनी स्पर्धा परीक्षा करताना सतत प्रेरणा दीली. एक शिक्षक देखील अधिकारी होऊ शकतो. हि एक संधी असुन, प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही. असा एक आत्मविश्वास निर्माण करून दिला. म्हणून घरी बसूनच अभ्यास सुरू केला. कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही. फक्त आईवडिलांचा पाठिंबा , पत्नी शबाना , मित्रवर्य बजरंग जाधव(DDR), विठ्ठल दराडे( पोलीस नीरीक्षक), उत्तम बनकर(CA) , यांचे मोलाचे मार्गदर्शन व अफजल शेख, संतोष बनकर, संतोष निंबाळकर , भारत जानकर ,नवनाथ तळे यांनी सतत प्रोत्सहन दिले.

नोकरी करत पहिल्या प्रयत्नात गट 'क' साठी असलेल्या तलाठी या परिक्षेत पात्र झालो. त्यानंतर गट 'ब' साठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्र झालो, परंतु त्यावेळीच्या तांत्रिक अडचणींमुळे मुलाखत देता आली नाही. जसजसे प्रयत्न करेल तसतसे यशजवळ येत होते. एकिकडे नोकरी सुरू होती. दुसरीकडे शेतीमध्ये लक्ष व त्यातून मिळालेल्या वेळेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू होता. कष्ट दमदार असेल तर यश देखील तेवढेच चमकदार असते म्हणतात तसे राज्यसवेत पहिले यश मिळाले. मुख्याधिकारीपदी निवड झाली. विशेष म्हणजे या पदासाठी कधीही बाहेरगावी जावुन अभ्यास करावा लागला नाही. की, कोणत्याही क्लासेसची गरज पडली नाही. फक्त स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास व मित्रांचे मार्गदर्शन यामुळे हे शक्य झाले होते.

इथपर्यंतच्या यशापर्यत पोहचल्यावर आत्मविश्वास आणखी दुणावला. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' म्हणून पुन्हा त्याच जोमाने अभ्यास सुरू ठेवला. अखेर पुढील प्रयत्नात ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील युवक देखील अधिकारी होऊ शकतो असा एक विचार समाजात गेला. सध्या सातारा उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती कधीही अडसर ठरत नाही. फक्त आपली कार्यक्षमता 'लाथ मारेल तिथे पाणी काढीन' अशी असावी. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घरी बसून देखील होऊ शकतो. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी व दांडगा आत्मविश्वास हवा. वेळप्रसंगी मिळेल त्या वाटेने प्रवास करण्याची तयारी असेल तर नक्कीच ध्येयापर्यंत पोहचता येता हा अनुभव मिळाला.

Web Title: Solapur Mpsc Exam Minaj Mulla Become Deputy Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..