सोलापूर : महापालिकेचा हरितवनाचा स्तुत्य उपक्रम

शहरातील अतिक्रमणांचा विळखा हटविण्याची योजना
सोलापूर : महापालिकेचा हरितवनाचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर : शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्याचे काम सुरू झाले आहे. हे अतिक्रमण हटविल्यानंतर ‘नव्याचे नऊ दिवस’ संपल्यानंतर तेथे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे नव्याने अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसते. परंतु महापालिकेने आता त्यावर कायमचा तोडगा काढण्याची योजना आखली आहे. शक्य तेथे हरितवन करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकच करावे लागेल. याबरोबरच महापालिकेने संभाजी तलावाचे रूपडे बदलण्याचे हाती घेतलेले काम पूर्ण करावे तसेच महापालिका हद्दीतील हिप्परगा (एकरुख), सोरेगाव तलाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे सुचवावेसे वाटते.

गेल्या काही वर्षांत सोलापुरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून तत्कालीन आयुक्तांनी सोलापूरकरांच्या मनावर आपले नाव कोरल्याचा इतिहास आहे. ही काही भूषणावह बाब नाही. काही आयुक्तांना या कामाबद्दल जेसीबीने हारही घातला गेला. परंतु त्यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने अन् दुप्पट जोमाने अतिक्रमण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढत्या अतिक्रमणावर कायमच्याच तोडग्याची खरी गरज आहे. सोलापुरातील एकही रस्ता या अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटलेला नसल्याचे विदारक चित्र दिसते. नाव सत्तर फूट पण रस्ता मात्र ३० फुटांचा झाला आहे. विजयपूर महामार्ग जरी असला तरी संभाजी तलाव ओलांडल्यानंतर थेट सैफुल चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी झालेल्या अतिक्रमणाच्या विळख्याने हा महामार्ग कसा असावा? असा आपसूकच प्रश्‍न पडतो. अद्ययावत मंड्या सोलापुरात असताना त्या सुनसान दिसतात अन् भाजी विक्रेते थेट रस्त्यावर बसलेले दिसतात. ग्राहकही रस्त्यावरच मोटारसायकली, चारचाकी लावत भाजी खरेदी करतानाचे विदारक चित्र सोलापूरकरांना काही नवे नाही. एखादी अघटित घटना घडली तर ते कोणत्या भावात पडेल याचा नेम नाही.

त्यामुळे वेळीच सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी महापालिकेकडे यंत्रणा असूनही त्याचा काही वापर झाल्याचे दिसले नाही. केवळ राजकारण्यांच्या वरदहस्तातून वाढणा-या अतिक्रमणाचा सर्वच बाजूने विचार करण्याची वेळ आली आहे. ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रफळावर वनराई असावी, असा निसर्गनियम. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात १.९० टक्के क्षेत्रावर वनराई असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे सोलापुरात प्रदूषण, धूळ व त्यातून होणारे आजार हे नेहमीचेच चित्र दिसते. यातून कधीतरी सुटका होणार की नाही, असा प्रश्‍न पडतो. शहरात धूळ पसरण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे, रस्ते दुभाजकातील मेलेली माती. ती दुभाजकातून खाली पडते अन् वाहनांमुळे रस्ताभर पसरते. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने रोड स्वीपर आणले आहेत. या स्वीपरमुळे माती पसरणे काही प्रमाणात कमी होईल, असा कयास आहे.

‘सकाळ’चा पुढाकार

जुळे सोलापूरच्या विविध प्रश्‍नांवर ‘सकाऴ’कडून कायम पाठपुरावा होत असतो. या भागातील विकास कामांबरोबरच अतिक्रमणांबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिकेने अतिक्रमण हटविले. इतक्यावरच न थांबता त्या ठिकाणी हरितवन करण्याची संकल्पना राबविली. बेकायदा काम होऊ नये यासाठी हा पाठपुरावा आहे. एकदा अतिक्रमण झाले की ते राजकीय वरदहस्ताने कायम राहते, असा अनुभव आहे. कोणाचाही रोजगार काढून घेण्याची भूमिका नसून महापालिकेने त्यांना पर्यायी गाळे उपलब्ध करून द्यावेत, असे वाटते.सोलापूरची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाणारे एकरुख (हिप्परगा) तलाव, होटगी तलाव, सोरेगाव पाणीपुरवठा केंद्र ही ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. संभाजी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू होते, ते ठप्प झाले आहे. या ठिकाणी बोटिंग, ऑक्सिजन निर्मितीसाठी कारंजे, लेसर शो अशा अनेक योजना होत्या. अजूनही तेथे जलपर्णीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. हे विदारक चित्र बदलताना जलजैवविविधता टिकून राहण्याचीही अपेक्षा आहे. सिद्धेश्‍वर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम स्मार्ट सिटी योजनेतून होताना जैवविविधतेला धोका होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सिद्धेश्‍वर वनविहार व स्मृतिवन या बलस्थानांमुळे काही प्रमाणात का होईना सोलापूरकरांना लाभ होत आहे.

‘सकाळ’चा पुढाकार

जुळे सोलापूरच्या विविध प्रश्‍नांवर ‘सकाऴ’कडून कायम पाठपुरावा होत असतो. या भागातील विकास कामांबरोबरच अतिक्रमणांबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिकेने अतिक्रमण हटविले. इतक्यावरच न थांबता त्या ठिकाणी हरितवन करण्याची संकल्पना राबविली. बेकायदा काम होऊ नये यासाठी हा पाठपुरावा आहे. एकदा अतिक्रमण झाले की ते राजकीय वरदहस्ताने कायम राहते, असा अनुभव आहे. कोणाचाही रोजगार काढून घेण्याची भूमिका नसून महापालिकेने त्यांना पर्यायी गाळे उपलब्ध करून द्यावेत, असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com