
सोलापूर महापालिका : भालेराव, देशमुख बडतर्फ तर विजय राठोड निलंबित
सोलापूर: महापालिकेत विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल भालेराव, लिपिक विजय देशमुख यांना शौचालय पाडकामप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. तर ड्रेनेज विभाग प्रमुख विजय राठोड यांनी प्रशासनाला ड्रेनेज जोडणीबाबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
विभागीय कार्यालय दोन येथे विभागीय कार्यालय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल भालेराव यांनी प्रशासनाची सक्षम मान्यता न घेता प्रभाग क्र. १ मधील वैदू वस्ती झोपडपट्टी येथील शौचालय पाडले. ही जागा देण्याचे अधिकार नसताना परस्पर खासगी व्यक्तीला ही जागा दिली. याबाबत विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीत आरोप सिध्द झाले आहेत. तसेच यापूर्वीही लाच स्वीकारल्याबद्दल सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे अतुल भालेराव आणि या चुकीच्या कामात सहभागी असलेला लिपिक विजय देशमुख यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. केंद्र शासनाने ड्रेनेज कामकाजाची माहिती मागविली
होती. यामध्ये ड्रेनेज विभाग प्रमुख विजय राठोड यांनी २०२१ मध्ये भरलेल्या एमआयएस फॉरमॅटमध्ये शहरातील २० टक्के घरांना ड्रेनेज जोडणी आहे. ८० टक्के घरांना ड्रेनेजची जोडणी नसल्याची चुकीची माहिती शासनाला दिली. त्यामुळे देशभरातील गुणवत्तेत शहर मागे पडला. महापालिकेला उणे गुणांक मिळाले आहेत. मनपाच्या गलथान कारभारामुळे निलंबनाची कारवाई केल्याचेही आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
Web Title: Solapur Municipal Corporation Suspended
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..