सोलापूर : ब्लॉक अध्यक्षांच्या माध्यमातून उमेदवारांचा शोध

नऊ अध्यक्षांवर जबाबदारी; महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी
congress logo
congress logosakal
Updated on

सोलापूर : काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेत प्रवेश करणाऱ्या अनेकांनी अडचणीच्या काळात पक्षाचा हात सोडला. तरीही, ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत आता शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. ३८ प्रभागांसाठी नऊ ब्लॉक अध्यक्ष नियुक्त केले असून, त्यांच्या माध्यमातून इच्छुकांचा शोध घेतला जात आहे.

काँग्रेसने ज्यांना महापालिकेतील सर्वोच्च पद दिले, त्याच महेश कोठे यांनी काही कारणास्तव पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेत जाऊन ते विरोधी पक्षनेते बनले. पण, पक्षांतर्गत कुरघोडीचे कारण देऊन त्यांनी शिवबंधन तोडून त्याच हातात ‘घड्याळ’ घातले. आता तेच कोठे शिवसेना व काँग्रेसच्या सोबतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित काम करणार आहेत. ज्यांनी अडचणीच्या काळात काँग्रेसची साथ सोडली, त्यांच्यासोबत महापालिका निवडणूक लढणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणतात, आमची स्वबळाची तयारी आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात फिरून ब्लॉक अध्यक्ष तेथील तुल्यबळ विशेषत: युवा व ज्येष्ठ नेत्यांचा अंदाज घेत आहेत. त्यांच्याकडे उमेदवारीची विचारणादेखील केली जात आहे. पण, राज्यात सत्तेत तिन्ही पक्ष असल्याने वरिष्ठांकडून निर्णय आल्यानंतर स्वबळावर की आघाडी करून निवडणूक लढवायची, याचा अंतिम फैसला होईल.

मात्र वरिष्ठांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना स्वाभिमान बाजूला ठेवून पक्ष सोडलेल्या माजी आमदार दिलीप माने, महेश कोठे, सुधीर खरटमल, नलिनी चंदेले, ॲड. यू. एन. बेरिया या नेत्यांसोबत काम करावे लागणार आहे.

२०१७ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादीला

देता आले नाहीत पूर्ण उमेदवार

२०१७ च्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती तुटली तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटली होती. त्यावेळी काँग्रेस व भाजपनेच १०२ जागांवर उमेदवार दिले होते. त्याशिवाय ना शिवसेनेला ना राष्ट्रवादीला तेवढ्या जागांवर उमेदवार देता आले. राष्ट्रवादीचे केवळ चारच नगरसेवक विजयी झाले होते. तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कोठे, चंदनशिवे, तौफिक शेख, ॲड. बेरिया, खरटमल यांच्यामुळे राष्ट्रवादीची ‘पॉवर’ वाढल्याचा आत्मविश्वास नेत्यांसह उमेदवारांमध्ये बळावला आहे. त्यामुळे जागा वाटपात शिवसेना, काँग्रेस सध्याच्या विजयी उमेदवारांच्या प्रमाणात जागा मागणार की तडजोड करणार, याची उत्सुकता आहे.

काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून, पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. ११३ जागांवर आमचे उमेदवार तयार असून, अनेकांनी पक्ष कार्यालयाकडे तसे अर्ज दिले आहेत.

- प्रकाश वाले,शहराध्यक्ष, काँग्रेस सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com