Solapur News : पशू वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहतीला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News : पशू वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहतीला आग

अक्कलकोट : येथील राजे फत्तेसिंह क्रीडांगणालगत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशू वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहतीला गुरुवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन त्वरित दाखल झाल्याने मोठे नुकसान व जीवितहानी टळली.

अधिकारी वसाहतीत सकाळी सापसफाई करण्यासाठी दोन कर्मचारी कार्यरत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे हमरस्त्यावरील नागरिकांनी पाहताच ते घटनास्थळी पोचले. आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना सामाजिक कार्यकर्ते अमिन मुजावर यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली. अमोलराजे भोसले यांनी त्वरित न्यासाचे अग्निशामक वाहन घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था केली. अग्निशामक वाहन तत्काळ दाखल झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान व जीवित हानी टळण्यास मदत झाली.

याबाबत बोलताना पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पायघुणे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या पशू वैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वसाहतीला गुरुवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान अचानक आग लागली. ती विझविण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अग्निशामक वाहन त्वरित दाखल झाल्याने नुकसान व जीवितहानी टळण्यास मदत झाली.