गणेश घाळे यांनी केली जिद्द, तांत्रिक ज्ञानाने उत्पादनात भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून जिद्दीने संकटावर मात करत एका पाठोपाठ उत्पादनांची निर्मिती करत ३५ कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे.

Solapur News : गणेश घाळे यांनी केली जिद्द, तांत्रिक ज्ञानाने उत्पादनात भरारी

सोलापूर : चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून जिद्दीने संकटावर मात करत एका पाठोपाठ उत्पादनांची निर्मिती करत ३५ कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. गणेश घाळे यांनी आयटीआयमध्य मेकॅनिकल ड्राफ्टसमन ट्रेडमध्ये शिक्षण घेतले. सुरवातीला त्यांनी एका खाजगी कंपनीत कामाची सुरवात केली. सतरा वर्षे त्यांनी काम केले. पण त्यांना स्वतःचे काही उत्पादन करावे, ही इच्छा होती.

घरातून अर्थातच नोकरी सोडण्यास विरोध होता. पण निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी एक दिवस कोणालाही न सांगता नोकरी सोडली. त्यांच्याकडे स्वतःची चिंचोली एमआयडीसीत जागा होती. त्यामुळे हा एक प्लस पॉइंट होता. या जागेत त्यांनी उत्पादन करण्यासाठी शोधाशोध सुरु केली. दररोजच्या वापरातील एखादी वस्तू असेल तर उत्पादनाची गरज सातत्याने लागते या आधारावर त्यांनी शोध केला. अशावेळी त्यांच्या पत्नी अश्विनी घाळे यांनी त्यांना भांड्याची घासणी तयार करावी, असे सुचवले. त्यांनी तत्काळ त्यासाठीच्या यंत्रसामग्रीचा शोध सुरु केला. बारामतीमध्ये त्यांना या यंत्राचा शोध लागला. त्यांचे मित्र श्री. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोबत राहून त्यांना प्रोत्साहन देण्याची कामगिरी चोख बजावली. त्यामुळे गणेश घाळे यांचा आत्मविश्वास वाढला.

त्यांनी यंत्राची खरेदी करून दीड लाख रुपयांचा कच्चा माल देखील मागवला. यंत्राची तांत्रिक बाब व कच्च्या मालाचा काही मेळ लागत नसल्याने अडचण झाली. त्यांनी यंत्रामध्ये तांत्रिक बदल करून कच्चा मालावर प्रक्रिया सुरु केली. तेव्हा कच्चा माल देणारे उद्योजक देखील चकित झाले.

उत्पादन विकण्यासाठी त्यांनी कोणत्याही व्यापाऱ्याकडे न जाता आठवडा बाजारातून विक्री सुरु केली. हळूहळू इतर व्यापाऱ्यांनी त्यांचा माल मागविण्यास सुरवात केली. चांगल्या पद्धतीने उत्पादन सुरु झाल्यावर गणेश घाळे शांत बसले नाहीत. त्यांनी घासणी पॅकिंगसाठी कोणावर अवलंबून न राहता पॅकिंगसाठी लागणारा कच्चा मालाचे मशिनरी देखील खरेदी करून त्याचेही उत्पादनाचे काम सुरु केले. ही पॅकिंग टुथब्रश, खेळणी व इतर काही वस्तूला उपयोगी पडत असल्याने त्याचे उत्पादन त्यांनी सुरु केले. या पॅकींगमुळे व्यवसायीच स्पर्धेत त्यांचे उत्पादन ग्राहकाला वाजवी दरात मिळणे शक्य झाले.

नंतर छोट्या आकाराच्या घरगुती पॅकिंग मशिन आणून त्यांचे काम स्थानिक कुटुंबाना देण्यास सुरु केली. त्यातून आणखी ३५ कुटुंबाना रोजगार मिळवून दिला आहे. आता त्यांनी नर्सरीसाठी लागणाऱ्या ट्रेची निर्मिती देखील सुरू केली आहे.

- भांडी घासण्याच्या घासणीची निर्मिती

- उत्पादनाच्या तयार पॅकिंगचे उत्पादन सुरु

- पॅकिंग मशीनमधून ३५ कुटुंबांना दिला रोजगार

- कारखान्यात ८ जणांना रोजगार

- नर्सरीसाठी लागणाऱ्या ट्रेची निर्मिती

- २४ तास उत्पादने व विक्री.

स्वतःचे उत्पादन असावे या संकल्पनेवर मी काम करत गेलो. उत्पादन करताना नवी आव्हाने समोर आली ते पेलत इतर उत्पादने सुरु करत गेलो. त्यामुळे उत्पादनात स्वावलंबी होणे शक्य झाले.

- गणेश मल्लीनाथा घाळे, उद्योजक