
Solapur : सामान्य कुटुंबातून पोलीस शिपाई ते अप्पर पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल मारलेले अशोक बनकर
सोलापूर : घरात अठराविश्व दारिद्र्य, गरीबी पाचवीलाच पुजलेली. शिक्षणाचा आणि कुटुंबाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. परंतु या परिस्थितीनेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पोलीस शिपाई ते अप्पर पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल मारलेले गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.
याबाबत श्री बनकर सांगतात की, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आबेलोळ हे गाव. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. शिक्षणाच्या बाबतीत कुटुंबात दहावी देखील कुणाची झालेली नव्हती. गावची परिस्थितीच तशी होती म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत गावाला फारसे काही आकर्षण नव्हते. गावातील क्वचित काही मुले शहरात जाऊन शिकली परंतु त्यांनी देखील विशेष असे काही प्राविण्य दाखविलेले नव्हते. त्यामुळे गावाजवळच असलेल्या एमआयडीसीत नोकरी करण्यासाठी गावातील सर्रास मुले आयटिआय करून तिथेच कंपनीत कामाला लागत असत. अशा वातावरणात माझे शिक्षण सुरू होते. त्यात घरच्या परिस्थितीनेच मला शिकण्यास मजबुर केले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत झाले. परिस्थिती जरी कमजोर असली तरी अभ्यासात मात्र हुशार होतो. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो, त्यामुळे अनेकांनी डिएड करून शिक्षक होण्याचा सल्ला. परंतु बारावीनंतर अवघ्या दोन गुणांनी 'डिएड' ला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे शिक्षक होण्याचा नाद सोडला. व कला शाखेची वाट धरली.
परंतु वडिलांची मात्र तीव्र इच्छा होती की, आयटीआय करून एमआयडीसीत नोकरी करावी. तसा हट्टच त्यांनी पाठीमागे धरला. परंतु या काळातच गावातील शिक्षकांच्या दोन मुलांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यांचे फोटो पेपर मध्ये आले असल्याने, त्यावेळी माहित झाले की, अशी काहितरी प्रशासकीय पदे स्पर्धा परीक्षेतुन भरली जातात. तोपर्यंत स्पर्धा परीक्षेचा कसलाही गंध नव्हता. 'बीए' चे शिक्षण सुरू झाले अन् घरात वाद देखील. सोबतची मुले आयटीआय करून नोकरीला लागली असल्याने, वडिलांनी आयटीआय करण्याचा हट्ट धरला. परंतु माझी काही इच्छा नसल्याने, घरात दररोज भांडण होऊ लागली. या सर्व गोष्टीला कंटाळून शेवटी वडिलांच्या इच्छेनुसार आयटीआयला प्रवेश घेतला.
परंतु एमआयडीसीत नोकरी करण्यास मात्र साफ नकार दिला. तेथील वातावरणात मनच रमत नसायचे. आयुष्यात नेमके काय करायचे हे नक्की नव्हते. परंतु काहितरी करायचं एवढ नक्की होते. आयटीआय चे शिक्षण हा आयुष्यातील खूप संघर्षाचा काळ होता. पहाटे चार वाजता उठून, अभ्यास करायचो. पैश्यांची चणचण भासत असल्याने, सकाळी सहा ते आठ विद्यार्थ्यांच्या शिकवण घेऊन त्यानंतर आयटीआयचे कॉलेज गाठायचो. शिकवणीच्या आलेल्या पैशातून काटकसर करत शिक्षण सुरू होते. त्यावेळी शिपाई पोलीस भरती जाहीर झाल्याने, एका मित्राने अर्ज करण्यासाठी आग्रह केला. मनातुन फारसा काही आत्मविश्वास नव्हता. परंतु परिक्षा शुल्क पाच रूपये असल्याने, मित्रांकडे दिले त्यानेच अर्ज भरला.
मैदानी स्पर्धेत कमी गुण मिळाले पण, बीए मधून शिक्षण झाले असल्याने, लेखीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने आलो. औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक ब्रिजेशसिंग यांनी मुलाखत घेतली. त्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे व परिक्षेतील गुणवत्ता पाहून त्यांनी मला शिपाई नव्हे तर अधिकारी म्हणून पोलीस खात्यात यावे असा सल्ला दिला. काही दिवसात निकाल लागला अन् पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. अधिकारी होण्याचं स्वप्न पाहु लागलो. त्याला आणखी बळ मिळाले ते औरंगाबादचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ संदीप भाजीभाकरे यांचे. त्यांच्याकडे असताना त्यांनी माझ्यातील अधिकारी होण्याची गुणवत्ता ओळखून, जवळ बसवून घेत मार्गदर्शन केले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मी एक पोलीस शिपाई असताना देखील त्यांच्या टेबलला बसवून घेत वेळोवेळी स्पर्धा परीक्षेबद्दल संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. त्यामुळे जिद्द व चिकाटीने अभ्यास सुरू केला. पुढे केगाव (सोलापूर) येथे प्रशिक्षण सुरू असताना मिळेल तो वेळ अभ्यासासाठी सार्थकी लावला. प्रशिक्षण घेऊन नोकरीवर हजर झालो. प्रथम काही परिक्षेत अपयश आले परंतु खच्चीकरण होऊ दिले नाही. पुन्हा प्रयत्न केले. जवळपास पाच वर्षं नोकरी व त्याचबरोबर अभ्यास केल्यानंतर एकाच वर्षात अनेक परिक्षा दिल्या. त्यामध्ये पहिल्यांदा एसबीआय मध्ये क्लार्क म्हणून, दुसरी एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून तर तिसरी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. व चौथी राज्यसेवेतून सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झाली. त्यानंतर काही दिवसांत पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली. अभ्यासात सातत्य व प्रत्येक टप्प्यावर वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आले.
परंतु श्री बनकर यांच्या संघर्ष जणू पाचवीलाच पुजलेला. पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा बजावत असताना त्यांना ब्रेन ट्यूमर झाला. त्यातुनच कसेबसे ते वाचले. तोपर्यंत कोरोना मध्ये २३ स्कोर होता. मरणाच्या दारात दोन वेळा बचावले. पण संघर्ष जणू रक्तातच भिनलेला असल्याने, आर्थिक परिस्थिती बरोबर, मृत्यूवर देखील मात करत ते आज सेवा बजावत आहे. विशेष म्हणजे शिक्षणाला वय नसते. हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. सध्या त्यांचे 'एमए' चे शिक्षण सुरू आहे.